राष्ट्रवादीची मागणी : देवस्थानच्या सचिवांना निवेदन
खेड । बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र भीमाशंकरचा विकास आराखड्याच्या शासन निर्णयात भीमाशंकरचा उल्लेख आंबेगाव ऐवजी खेड करावा, तीर्थक्षेत्र भीमाशंकर खेड तालुक्यात असल्याने खेड तालुक्याला निधी मिळावा, अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन खेडचे तहसीलदार तथा श्रीक्षेत्र भीमशंकर देवस्थान ट्रस्टचे सचिव विठ्ठल जोशी यांना देण्यात आले आहे.
ज्योतिर्लिंग भीमाशंकर खेड तालुक्यात आहे. विकास निधी आंबेगावला असे अनेकदा झाले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी आलेला निधी आंबेगावला पळविण्यात आल्याने खेड तालुक्यातील भीमाशंकरजवळ असलेली अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आहेत. यामुळे खेड तालुका विकासापासून मागे आहे. भीमाशंकर खेड तालुक्यात असल्याने भीमशंकर परिसरातील खेड तालुक्यातील गावांचा विकास होणे अपेक्षित असताना तसे न होता हा विकास आंबेगाव तालुक्यातील गावांचा होत आहे. सध्याच्या विकास आराखड्यात आंबेगाव तालुक्याचा उल्लेख झाला आहे. तो ताबडतोब बदलून घ्यावा. तसे झाले नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन विठ्ठल जोशी यांना देण्यात आले. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कैलास लिभोरे, चंद्रकांत इंगवले, अरुण चांभारे, बाळासाहेब सांडभोर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.