जळगाव : जागतिक विक्रम ठरलेल्या श्रीगणेश म्युरलच्या विसर्जनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. सलग चार दिवसांपर्यत अर्थात गुरूवारपर्यंत ‘त्या’ एक लाख बाटल्या रिकाम्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या एमआयडीसीतील एका कंपनीत पुर्नवापरासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी दिली.
जागतिक विक्रमासाठी ओजस्विनीच्या फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांकडून एकलव्य क्रीडा संकुलनार भव्य एक लाख बाटल्यांपासूनचे श्रीगणेश म्युरल तयार करण्यात आले होते़ दहा ते बारादिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या निमित्ताने पार पडले़ दरम्यान, सोमवारपासून या श्रीगणेश म्युरलच्या विसर्जनाला सुरूवात झाली आहे़ पहिल्याच दिवशी ओजस्विनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह ५० विद्यार्थ्यांनी रंग भरलेल्या पाण्याच्या बाटलया उचलण्याचे काम सुरू केले़ ते एका ठिकाणी जमा केले आहे़ पन्नास टक्के बाटल्या ह्या उचलवून झालेल्या आहेत. सोमवारी काही रंगाच्या बाटल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
बॅरलमधून शोषखड्डयात पाणी सोडले
बाटल्या रिकाम्या करण्यासाठी एक स्टेज उभारण्यात आलेले आहे़ त्या स्टेजवर आठ बॅरल ठेवण्यात आली आहेत़ विद्यार्थी बाटल्या उचलून त्या बॅरलमध्ये त्या बाटल्या रिकाम्या करत आहेत़ आठही बॅरलला पाईप जोडलेली आहेत़ त्यामुळे सर्व बॅरलमधील पाणी पाईपलाईनद्वारे अडीचशे मीटरच्या अंतरावर ४ फुट खोल शोषखड्डयात पाठविले जाते़ विशेष म्हणजे मू़जे़ महाविद्यालयाच्या जलश्री या विभागाकडून खड्डयात मातीचे चार थर तयार केले आहेत़ त्यामुळे पाणी व रंग हे वेगळे होऊन पाणी जमीनीत शोषले जात आहे.