तब्बल 64 तासानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्त
दुबई/मुंबई : प्रख्यात सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईतील एका हॉटेलात बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्यानंतर दुबई पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी हाती घेतली होती. परंतु, या चौकशीची फाईल तातडीने बंद करत तेथील सरकारी वकिलांनी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मृतदेह तब्बल 64 तासानंतर कपूर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तत्पूर्वी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. उद्योगपती अनिल अंबानी यांनी आपले खासगी विमान श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी दुबईला पाठविले होते. या विमानाद्वारे रात्री साडेदहा-अकरा वाजेच्या सुमारास हा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. बुधवारी दुपारी एक वाजेनंतर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर मुंबईतील पार्ले स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, तत्पूर्वी त्यांचे पार्थिव सेलिब्रेशन स्पोर्ट क्लबमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे, श्रीदेवी यांच्या संशयास्पद मृत्यूची फाईल दुबई सरकारने बंद केली असून, त्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यासाठी तेथील सरकारी वकिलांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. श्रीदेवी यांचा मृत्यू शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बाथटबमध्ये बुडून झाला होता. पोलिसांनी बोनी कपूर यांच्या चौकशीनंतर त्यांना क्लीनचिट दिल्याची माहिती कपूर कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आली आहे.
बोनी कपूर यांची चौकशी, नंतर क्लीनचिट!
शनिवारी श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडून झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे शवपरीक्षण केले असता, त्यांचा मृत्यू हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या मृत्यूप्रकरणी चांगलीच गुंतागूंत निर्माण झाली होती. रविवारी व सोमवारी सरकारी पक्षाने याप्रकरणी कसून चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी सरकार पक्षाने श्रीदेवी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला व बोनी कपूर यांच्या चौकशीनंतर त्यांना क्लीनचिट दिली, तसेच मृतदेह नेण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्रही कपूर कुटुंबीयांकडे सुपूर्त केले. दुबई सरकारकडून नाहरकत मिळाल्यानंतर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर रसायनिक प्रक्रिया करण्यात आली. त्याला दोन तासांचा वेळ लागला. त्यानंतर पार्थिव शरीर कपूर कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले. हे पार्थिव आणण्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी यांनी आपले खासगी विमान दुबईला रवाना केले होते. या विमानाद्वारे रात्री साडेदहा-अकरा वाजेच्या सुमारास श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत पोहोचले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांच्यावतीने देण्यात आली. याप्रसंगी बोनी कपूर यांच्यासोबत त्यांचा मुलगा अर्जुन कपूर, मुलगी खुशी कपूर हेदेखील होते.
दाऊदने केली श्रीदेवींची हत्या : खा. स्वामी
गरज पडल्यास श्रीदेवी यांचे पुन्हा शवपरीक्षण केले जाईल, असे दुबई सरकारच्या वकिलांनी सांगितल्यानंतर काहीकाळ अनिश्चितता निर्माण झाली होती. तर श्रीदेवी यांची हत्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याने केल्याचा आरोप भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. श्रीदेवी यांची शुद्ध हरपली आणि बाथटबमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला, असे दुबई पोलिसांनी सांगितले होते. पण, पोलिसांच्या या दाव्यावर खा. स्वामी यांनी संशय व्यक्त केला आहे. प्रॉसिक्युशन डिपार्टमेंट काय जाहीर करते याची वाट पाहू या. पण श्रीदेवी कधीच दारु प्यायली नाही. मग् त्यांच्या शरीरात अल्कोहल कसे आढळले? सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? डॉक्टर्स अचानक माध्यमांसमोर आले आणि श्रीदेवी यांचा मृत्यू हदयविकाराने झाल्याचे कसे काय म्हणाले? अशा शंका खा. स्वामी यांनी उपस्थित केल्या आहेत. श्रीदेवी यांचा मृत्यू नव्हे तर त्यांची हत्या झाली असल्याचा आरोपही खा. स्वामी यांनी केला आहे.