श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने ऊसतोड कामागारांना पुरविल्या विविध सोयीसुविधा

0

नांदूर । श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये यंदाच्या गळीत हंगामासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांसाठी कारखान्याच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात आरोग्यासह शिक्षणाचीही सोय केली आहे, असे कारखाना अध्यक्ष पांडूरंग राऊत यांनी सांगितले.शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कारखाना साइटवर वास्तव्यास असलेल्या ऊसतोडणी बांधव, वाहनचालक महिला यांच्यासाठी आठ स्वच्छतागृहांची कारखान्याने स्वखर्चाने उभारणी केली आहे. तसेच स्वच्छ पाणी, माफक दरात उपचारांची सुविधा उपलब्ध केली आहे. कुटुंबाच्या स्थलांतरामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. या स्थलांतर झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत कारखाना साइटवर साखरशाळा सुरू केली आहे.

मोफत पोषण आहार
कारखान्याच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप केले जात आहे. कारखाना आणि जिल्हा परिषदेमार्फत मोफत पोषण आहारही दिला जात आहे. विद्यार्थ्यांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीही केली जात आहे. शिक्रापूर येथे कारखान्याच्या माध्यमातून श्री जनसेवा प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्व. संभाजी करपे आयुर्वेदिक चिकित्सालय, महिला सबलीकरणाच्या दृष्टीकोनातून स्व. कलावती राऊत महिला प्रशिक्षण केंद्र, आथिकदृष्ट्या मागासवर्गीय अनाथ आणि ऊसतोडणी मजुरांच्या मुलांकरीता स्व. संभाजीराव भुजबळ नावाने वसतिगृह सुरू केले आहे.

80 मुले शाळेत दाखल
यंदाच्या हंगामात झालेल्या जणगणनेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत 63 आणि पाचवी ते सातवी पर्यंतचे 17 असे एकूण 80 विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. कारखाना आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेठाणमार्फत मजूर कामगारांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मुले शाळेत पाठवण्याबाबत प्रोत्साहीत केले जात आहे.

लवकरच पाळणाघर
ऊसतोड मजूर महिला मुलांना घरी ठेवून कामावर जातात. त्यामुळे या मुलांची हेळसांड होत असते. याचा परिणाम त्या मुलांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे कारखाना परिसरात लवकरच पाळणाघर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच पाळणाघर तयार करून लहान मुलांची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष पांडूरंग राऊत यांनी सांगितले.