श्रीमंतांच्या यादीत मायानगरी मुंबई बाराव्या स्थानावर!

0

न्यूयॉर्क सर्वाधिक श्रीमंतांचे शहर, लंडनचा दुसरा क्रमांक; न्यू वर्ल्ड वेल्थ सर्वेक्षण संस्थेचा अहवाल जाहीर
मुंबई । श्रीमंतांच्या यादीत मायानगरी मुंबईने जगात 12 वा क्रमांक पटकावला आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पहिल्या 15 मध्ये आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, मुंबईने श्रीमंत शहरामध्ये पॅरिस आणि टोरंटोसारख्या शहराला मागे टाकत 12 वे स्थान पटकावले. या यादीत न्यूयार्क शहर प्रथम स्थानावर विराजमान असून, येथील लोकांकडे तीन ट्रिलियन डॉलरची संपत्ती आहे. 2.7 ट्रिलियन डॉलरच्या संपत्तीसह लंडन दुसर्‍या, तर सॅनफ्रान्सिसको तिसर्‍या स्थानावर आहे. बीजिंग, शांघाय, सिडनी या शहरांचादेखील या यादीत समावेश आहे.

मुंबईची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलर
न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, मुंबईची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलरची असून, येथे 28 अब्जाधीश राहतात. तर टोरंटो (944 अब्ज डॉलर), फ्रँकफर्ट (912 अब्ज डॉलर) आणि पॅरिस (860 अब्ज डॉलर) यांची संपत्ती एवढी आहे. ही पाहणी करताना त्या-त्या शहरातील लोकांकडे असलेल्या खासगी संपत्तीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यात मालमत्ता, रोख, शेअर्स, व्यवसाय आदींचा समावेश आहे. सरकारी निधी मात्र यातून वगळण्यात आली आहे.

मुंबईत एकूण 28 अब्जाधीश..
अब्जाधीशांच्या यादीत मुंबई जगातील पहिल्या दहा शहरामध्ये येते. मुंबईत एकूण 28 अब्जाधीश राहतात. त्यांची संपत्ती एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त होते. संपत्तीच्या वाढीबाबत पुढील दहा वर्षांत मुंबईचा वेगाने विकास होणार असून, उद्योग, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि मीडिया या क्षेत्रांचे माहेरघर असल्याचे मुंबईबाबत न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालात म्हटले आहे.