श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याची दूरवस्था

0

पुणे । मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत बाजीराव पेशव्यांची शुक्रवारी जयंती होती. मात्र, पुणे महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. शनिवारवाड्यासमोरील पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्यांची स्वच्छता करण्याचे कष्टही उचलण्यात आले नाही. एवडेच नाही तर महापौर अथवा इतर महापालिका पदाधिकार्‍यांनी पुतळ्याला साधा पुष्पहारही अर्पण केला नाही. त्यामुळे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महापालिकेचा निषेध करण्यात आला आहे.

पहिल्या बाजीराव पेशव्यांची शुक्रवारी 317 वी जयंती होती. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत दिल्लीपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आणि अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात एकाही लढाईत पराजित न झालेल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याकडे लक्ष देण्यास पालिकेला वेळ नसल्याचे चित्र आहे. पुतळ्याची झालेली दुरवस्था पाहून काही संघटनांनी सकाळी आक्षेप नोंदवल्यानंतर त्यावर पांघरून घालण्यासाठी दुपारनंतर पांढरे कापड टाकून दुरवस्था झाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर दुपारी महापौर मुक्त टिळक, जगन्नाथ लडकत, डॉ. वि. वि. तथा उदयसिंह पेशवे, एअरमार्शल भूषण गोखले, रमेश भागवत, उदय कुलकर्णी, मोहन शेटे, सुनील शितोळे, सुलभा कोकाटे यांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले.