श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आहेत संपूर्ण जीवन सफल बनवण्यासाठीचे कानमंत्र!

0

गीता जयंतीचा उत्सव देशभरातच नाही, तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक ठिकाणी गीतेतील अध्यायाचे पठण केले गेले. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी मार्गदर्शनपर सांगितलेली तत्त्वे आचरणात आणण्याची प्रेरणा मिळत असते. गीतेमधील या उपदेशांमध्ये आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य आहे, असे काहींचे म्हणणे आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये सतत पाहाव्या लागणार्‍या अपयशामुळे त्रस्त असेल, तर अशा व्यक्तींसाठी आयुष्यामध्ये सफलता मिळवण्याचे मार्गदर्शनदेखील भगवद्गीतेमध्ये केलेले आहे.

आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडून गेले आहे, जे काही घडते आहे आणि भविष्यात जे घडणार आहे, ते सर्व आपल्या चांगल्याकरिताच आहे, यावर मनुष्याने पूर्ण विश्‍वास ठेवायला हवा. जे घडून गेले आहे आणि जे पुढे घडणार आहे, यावर मनुष्याचे नियंत्रण नसते. त्यामुळे त्यासाठी मनुष्याने स्वत:ला किंवा स्वत:च्या नशिबाला दोष न देता, आपल्या हातामध्ये असलेल्या वेळेचा संपूर्ण सदुपयोग करणे आवश्यक आहे. आज वेळेचा सदुपयोग झाला, तर त्याच्या परिणामस्वरूप येणारा काळ यश घेऊन येतो, असे भगवदगीता सांगते.

कित्येक वेळा कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी आपण त्या कामाच्या परिणामाचा विचार करून चिंतित होतो. आपण केलेल्या कामाचे परिणाम आपल्या मनासारखे होतील किंवा नाही, त्यातून आपल्याला फायदा होईल, की नुकसान होईल या चिंतेने आपण ग्रस्त असतो. असे न करता, काम करावे, पण त्याच्या परिणामाची चिंता करू नये, असा उपदेश भगवद्गीता करते. परिश्रमाने आणि चांगल्या भावनेने केलेल्या कामाचे परिणामदेखील चांगलेच होत असतात. त्यामुळे अपयश आले, तरी आपले प्रयत्न सोडू नयेत.

परिवर्तन हा जगाचा नियम असल्याचे भगवद्गीता सांगते. त्यामुळे आपल्या जीवनात अचानक आलेल्या लहानमोठ्या बदलांनी घाबरून न जाता आपल्या ध्येयाकडे आपली वाटचाल सुरू ठेवावी. आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या परिवर्तनाचा सामना आपण किती खंबीरपणे करू शकतो यावर आपले यश अवलंबून असते. त्यामुळे अचानक उद्भवलेले लहान मोठे बदल स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी.मनुष्याला आयुष्यामध्ये निरनिराळे मोह असतात. कोणाला पैशाचा मोह असतो, कोणाला नातेवाईक, परिवारजन, तर कोणाला वस्तूंचा मोह असतो. या मोहापायी मनुष्य अविचारी बनू शकतो. भगवद्गीता म्हणते, की मनुष्याने कोणत्याही गोष्टीत आपले मन जास्त गुंतवू नये. मनुष्य या जगामध्ये येताना जसा रिकाम्या हाताने येतो, त्याचप्रमाणे या जगाचा निरोप घेतानादेखील त्याला रिकाम्या हातीच जावे लागते, त्याने आयुष्यभर कमावलेला पैसा, जोडलेले नातेवाईक, मित्रमंडळी सगळे मागे राहतात आणि अखेरचा प्रवास मनुष्याला एकट्यानेच, रिकाम्या हाताने करावा लागतो.

कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ किंवा कोणत्याहीबाबतीत राग येणे या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे या दोन्ही अवगुणांवर ज्याला नियंत्रण ठेवता येते, तो मनुष्य खर्‍या अर्थाने आयुष्यात प्रत्येकबाबतीत यशस्वी ठरतो. त्याचबरोबर मनुष्याने आपल्या विचारशक्तीवरही नियंत्रण ठेवायला हवे. चांगला विचार चांगली परिस्थिती निर्माण करतो, तर राग, द्वेष, मत्सर अशा नकारात्मक भावनांमुळे परिस्थितीदेखील नकारात्मक बनत जाते.मनुष्याने दररोज काही काळ शांतपणे ध्यानधारणा करायला हवी. आपण करत असलेल्या प्रत्येक कार्याचे, घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाचे मनन करायला हवे तसेच कोणत्याही गोष्टीबाबत आपले मन साशंक असेल, तर ती गोष्ट करू नये. जर एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल, तर त्या गोष्टीमध्ये सफलता मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे विचारपूर्वक घेतलेले निर्णय मनुष्याला यशस्वी बनवतात.

– जयवंत हाबळे
वरिष्ठ उपसंपादक जनशक्ति, मुंबई
8691929797