श्रीमलंग गड येथील फ्युनिक्युलर रेल्वेसाठी आता फक्त ६ महिन्यांची प्रतीक्षा

0

डोंबिवली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमलंग गड येथील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेच्या कामाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आता गती मिळाली असून अवघ्या सहा महिन्यांमध्ये ही फ्युनिक्युलर रेल्वे भाविकांच्या सेवेत दाखल होत आहे.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी श्रीमलंगवाडीला भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रसंगी या फ्युनिक्युलरचे काम करणारे श्री वसंत जोशी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गट विकास अधिकारी सोनटक्के, अन्य अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

२०१३ सालापासून हे काम रखडले असून खा. डॉ. श्रीकांत शिंदे या कामाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भात अनेक बैठका झाल्यानंतर आता या कामाला गती मिळाली असून ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, असे याप्रसंगी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कामात आता कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा खा. डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी दिला. तसेच, उर्वरीत कामे पूर्ण करून येत्या सहा महिन्यांत ही सेवा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थानिकांना पर्यायी रोजगार देणार
सध्या श्रीमलंगडावर जाण्यासाठी भाविकांना पायऱ्यांचा पर्याय उपलब्ध आहे. या पायऱ्यांच्या दुतर्फा दुकाने असून डोलीमधून भाविकांना गडावर नेण्याचा व्यवसायही काही मंडळी करतात. फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झाल्यानंतर या रोजगारावर गदा येऊ देणार नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शासन स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल, तसेच डोलीवाल्यांनाही पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही खा. डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी दिली.