पिंपरी-चिंचवड : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे कामाच्या जोरावर नव्हे; तर मोदी लाटेमुळे खासदार झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये बारणे यांचे अपयश ठळकपणे समोर आले आहे. त्यामुळे बारणे हे पक्षासाठी आणि जनतेसाठी अपयशी खासदार ठरले आहेत, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. तसेच भाजपची सर्वत्र घौडदौड सुरू असल्याने बारणे धास्तावले आहे. त्यामुळे पक्षात वाद उकरून काढून ते शिवसेनेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत. परंतु, हिंमत असेल, तर त्यांनी शिवसेनेकडूनच लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हानही दिले आहे.
महापालिका ते पंचायत समितीत पराभवच
जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी लाटेमुळे बारणे यांची नौका तरली. अन्यथा ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकले नसते. खासदार झाल्यानंतर आपण लोकांची कामे केली आहेत, असे ऊर बडवून ते सांगत आहेत. असे असेल तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिले? याचे एक तरी उदाहरण द्यावे. त्यांनी जनतेची कामे न केल्यामुळेच पिंपरी-चिंचवड आणि पनवेल या दोन महापालिका आणि लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
काँग्रेस संपविली, आता सेनेचीही वाटचाल
शिवसेनेला सातत्याने पराभव पहावा लागल्याने बारणे अपयशी खासदार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी शिवसैनिकांना बळ देण्याचे काम केले नाही. त्यांचे खच्चीकरण केले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी संधीची वाट पाहत आहेत. भाजपची सर्वत्र सुरू असलेली घोडदौड, शिवसैनिकांची नाराजी आणि खासदार असूनही आलेले अपयश यामुळे हे अन्य राजकीय पक्षांत जाण्याची चाचपणी करत असल्याचे वृत्त वारंवार प्रसिद्ध होत आहे. मात्र ते ज्या पक्षात जातात तो पक्ष राजकारणात बुडतो, ही वस्तुस्थिती आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. हा पक्ष आता शहरात केवळ नावालाच शिल्लक आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेचीही वाटचाल काँग्रेसच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याच राजकीय पक्षांकडून शब्द मिळत नसून, ते सैरभैर झाले आहेत.
स्वत:च्या घराजवळसुद्धा पक्षाचा नगरसेवक नाही
महापालिका निवडणुकीत तर खासदार बारणे यांना आपण स्वतः राहात असलेल्या थेरगाव परिसरातून देखील पक्षाचे नगरसेवक निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे बारणे यांच्यावरील अपयशी खासदाराचा शिक्का अधिक गडद झाला आहे. त्यामुळेच ते पक्षातच वाद उकरून काढून शिवसेनेतून बाहेर पडण्याचा अंतिम मार्ग शोधत आहेत. मात्र केवळ मोठ्या वल्गना करण्यात धन्यता मानणारे आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी माहीर असलेले बारणे यांनी हिंमत असेल, तर आगामी निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडूनच निवडणूक लढवून दाखवावी. नाराज शिवसैनिक आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते बारणे यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज आहेत, असे आव्हान त्यांनी दिले आहे.