चोपडा। कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले अयोध्यानगरी हि प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. यावर 2010 वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदूंना पूजा करण्यासाठी शिक्कामोर्तब केला आहे. परंतु अद्याप पर्यंत हिंदूंना अयोध्येतील श्रीराम मंदिरात पूजा करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हिंदु बांधवाना मंदिरात पुजा करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन समितीतर्फे तहसिल कार्यालयातील आवारात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करीत घोषणा दिल्या. गेल्या 15 वर्षात उत्तर प्रदेशातील अयोध्येत पूजा करण्याचा अधिकार मिळू शकला नाही परंतु आता केंद्रात व राज्यात हिंदुत्व विचारसरणी असलेल्या भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे आता तरी श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
कायदा व्हावा: संसदेत श्रीराम मंदिर उभारणी संदर्भातील कायदा बनवून त्या आधारे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारण्यास प्रारंभ करावा. तसेच वर्ष 2017 च्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणार्या राज्यस्तरीय विविध योजनांसाठी वर्ष 2017-2018 मध्ये 332 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित केला. परंतु हिंदू धर्मियांच्या विकासासाठी एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही. धार्मिक भेदभाव न करता समान निधीं सर्व धर्मियांना देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
भुषण जाधवची शिक्षा रद्द करा
फेबु्रवारी 2016 मध्ये पाकिस्तानात गेलेल्या भुषण जाधवला गुप्तहेर समजुन पाकिस्तान शासनाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानातील हिंदू भूषण जाधव याला खोटया आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तरी भूषण जाधव देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणीही यावेळी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली. निवेदन देतांना हिंदू जनजागृती समितीचे यशवंत चौधरी,सुधाकर चौधरी, अनिल पाटील, किशोर दुसाणे, राष्ट्रीय स्वयंसंघाचे चेतन बिर्हाडे, राजेंद्र स्वामी, शिवसेना उपशहर प्रमुख हरीश पवार, डॉ.रोहन पाटील, शांताराम पाटील, नरेंद्र जैन, रणरागिणी कुसुम पाटील, मनिषा माळी, वंदना माळी, अनिता भोई, यासह मोठया संख्येने हिंदुत्ववादी उपस्थित होते.