मुंबई: सुप्रीम कोर्टाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याला परवानगी दिली आहे. लवकरच सरकारतर्फे राम मंदिराच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. राम मंदिराच्या कामासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. दरम्यान या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले आहे.
‘केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. या निर्णयामुळं अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल, अशी अपेक्षा आहे. या निर्णयासाठी मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन,’ असं ट्विट राज यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी २३ जानेवारीला मनसेच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. हिंदुत्त्वाची भूमिका मनसेने जाहीर केल्याने मनसे आता हळूहळू भाजपच्या जवळ जात असल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोप कॉंगेससह, एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी केले आहे.