श्रीराम ठिबकच्या संचावर कंपनीतर्फे 40 टक्के सूट

0

नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना दिलासा ; श्रीराम पाटलांची माहिती

रावेर (प्रतिनिधी)- श्रीराम ठिबक कंपनीतर्फे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून यावलसह मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील बळीराजांना ठिबक सिंचन संचाच्या किमतीत 40 टक्के सूट कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे श्रीराम ठिबकचे सर्वेसर्वा श्रीराम पाटील म्हणाले. साईराम प्लास्टिक व श्रीराम ठिबक कंपनीतर्फे शहरातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परीषद घेण्यात आली. याप्रसंगी पाटील म्हणाले की, प्रत्येक शेतकर्‍याला एक हेक्टरपर्यंतच लाभ दिला जाईल. तीन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी भुईसपाट झाली असून या तालुक्यातील लोकांनी सहकार्य केले असून शेतकर्‍यांवरील संकट आपल्याकडून पाहिले जात नसल्याने पुढील केळी लागवडीसाठी शेतकर्‍यांना मदतीचा हात आम्ही त्यांना देणार आहोत. पात्र शेतकर्‍याला शासनाकडून मिळणारी सबसिडी त्यांचीच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रसंगी राजू पाटील, कंपनीचे जीएम धनराज चौधरी, जयंत भालेराव, कृषी तज्ञ गुणवंत डफरे, ब्रिजलाल पाटील, प्रवीण महाजन, डॉ.सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

कंपनीच्या कार्यालयात संपर्क करण्याचे अवाहन
रावेर येथे कंपनीच्या कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी काउंटर उघडण्यात आले असून शेतकर्‍यांनी शेताचा नुकसानीचा पंचनामा, आधार कार्ड, सातबारा उतारा येथे द्यावा तसेच काही अडचण असल्यास कंपनीचे संजय पुनतकर, पंकज सपकाळ, नरेंद्र पाटील, योगेश महाजन यांच्यांशी संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले.

भाजपा-राष्ट्रवादीच्या कलगीतुर्‍यातून सकारात्मक निर्णय
तालुक्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर एकीकडे बळीराजा संकटात सापडला असताना भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांमध्ये वाद पेटला आहे. केळीची भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वच पक्षांचे शिष्टमंडळांनी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे. मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र तूर्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी श्रीराम कंपनीने पुढाकार घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.