धुळे । काही दिवसापुर्वी मुंबई- ठाण्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या मशिनमध्ये चिप बसवून पेट्रोल चोरी केली जात असल्याचे उघड झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर धुळ्यात ही 1 जुलै रोजी मुंबई पोलीस शहर शाखेने कारवाई केली. सकाळी 7 वाजता श्रीराम पेट्रोल पंपावर छापा पडताच ही बातमी धुळ्यासह जिल्हाभरातील पेट्रोल पंप चालकांपर्यंत वार्यासारखी पसरली. मापात पाप करणार्या पंप चालकांनी संभाव्य कारवाईच्या भितीने पंपाच्या मशिनमध्ये केलेली सेटींग बदलवली.
मुंबईतील पथकाद्वारे कारवाई
त्यामुळे काही दिवस का होईना धुळेकरांसह जिल्हाभरातील वाहन धारकांना पुर्ण पेट्रोल मिळेल. मुंबईचे सीटी क्राईमचे पोलिस निरीक्षक संजय जॉन यांचे पथक पेट्रोल मध्ये भेसळ प्रतिबंधक पथक, वजनमापे खात्याचे पथक यांना सोबत घेत धुळ्यात धडकले.मनोहर टॉकीज जवळील,छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर असलेल्या श्रीराम पेट्रोल पंपावर या पथकाने धाड टाकली. 25 जणांचा समावेश असलेल्यापथकाने सकाळी 7 वाजेपासून कारवाईला सुरुवात केली.
बहुसंख्य पंपांवर सेटींग वाहनधारकांच्या तक्रारी
धाड टाकल्यानंतर ग्राहकांना दुसर्या पेट्रोल पंपावर जाण्यास सांगितले. धाड टाकण्यासाठी पीआय संजय जॉन यांनी धुळ्याच्या एलसीबीच्या पथकाला सोबत घेतले. एलसीबीचे एपीआय विनोद पाटील, हे.कॉ.कापुरे, बी.एम.मोरे, सोनवणे हे बंदोबस्तासाठी आहेत.वजनमापे निरीक्षक, भेसळ रोखणारे पथक, पेट्रोल पंपाची, त्यातील यंत्रसामग्रीची कसून तपासणी करीत होते. धुळ्यातील बहुसंख्य पंपांवर सेटींग केल्याच्या वाहन धारकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीनुसार मुंबईचे सीटी क्राईम पथक धुळे शहरात दाखले झाले आहेत. या पथकाने पहिल्या दिवशीच धडक कारवाई केल्याने पेट्रोल पंपचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या पथकाने यंत्र सामग्रीची तपासणी केल्याने काहींनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले.
पेट्रोल कमी मिळाल्याची तक्रार
पेट्रोल भरले जात असतांना काही ठिकाणी पेट्रोल पंप यंत्रांमध्ये शुन्य रुपये नव्हे तर दोन रुपयांपासून सुरुवात होते तर काही ठिकाणी सहा ते आठ रुपयांपासून सुरुवात होते.त्यामुळे आम्हाला पेट्रोल कमी दिला जातो अशी ग्राहकांची तक्रार असते. प्रेशरमुळे असे होते,असा तर्क पेट्रोल पंपावरील कर्मचारी देत असतात. मात्र आजच्या धाड – सत्रामुळे मापात पाप करणार्या पंप चालकांमध्ये मात्र धडकी भरली आहे.