इतर पक्षांपेक्षा हिंदुत्वावर भविष्यात शिवसेनाच जास्त आक्रमक असणार
मुंबई : कर्नाटकात शिवसेना विधानसभेची निवडणूक लढणार आहे. नुकताच याबाबत निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. विशेष म्हणजे श्रीराम सेनेच्या मदतीने सेना ही निवडणूक लढवणार आहे. धनुष्य बाण या शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. याबद्दलची चर्चा पूर्ण झाली असून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यापद्धतीने काम करणाऱ्या उमेदवारांची निवड स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. कर्नाटकात १० ते १५ वर्षांपासून शिवसेना काम करीत आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्यात येणार आहे. इतर पक्षांपेक्षा हिंदुत्वावर भविष्यात शिवसेनाच जास्त आक्रमक असणार आहे.
-पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या
गुलबर्गा, कारवार, बिदर, बेळगाव येथे तालुका पंचायत, ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकात शिवसेनेने यश मिळवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात निवडणूक लढविली जाणार असून प्रत्येक मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार राहील. शिवसेनेने यासाठी काही पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या देखील सोपवल्या आहेत. राजू भवानी यांच्यावर गुलबर्गा बिदर रायचूर यादगिरी, तर कुमार हकारी यांच्याकडे हुबळी धारवाड,हावेरी कारवार कोप्पळ गदग बेळळारी , महानिंगपा, गुंजगावी, विजापूर, बागलकोट, मंगळूर, उडुपी आणि कारवार हे जिल्हे देण्यात आले आहेत. आनंद शेट्टी, शिवकुमार रेड्डी हे बंगळुरू मैसूर सह दक्षिण कर्नाटकातील 8 जिल्हे, तसेच महेश कोप्प यांच्याकडे चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावनगेरे शिमोगा, हेमंत हसन आणि कोडगू जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
-कोपर्डी प्रकरणी निकमच हवेत
कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीचे वडील बबन सुद्रीक आणि स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. यावेळी उच्च न्यायालयातही उज्ज्वल निकम यांना कोपर्डीचा खटला लढवण्यासाठी नियुक्त केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी उद्धव यांच्याकडे केली. उद्धव यांनी त्याचे समर्थन करत कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालयात उज्ज्वल निकम यांनीच खटला लढवावा, अशी मागणी केली.