कोलंबो : श्रीलंकन क्रिकेटपटू कुसल मेंडिस याच्या कारखाली चिरडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. मेंडिसला कोलंबो पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कोलंबोपासून 30 किमी दूर असलेल्या पानादुरा शहरात आज रविवारी सकाळी हा अपघात झाला. 64 वर्षीय वृद्ध व्यक्ती सायकल चालवत होती. मेंडीसच्या कारने चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मेंडीस पसार झाला, मात्र पोलिसांनी त्याला काही तासातच बेड्या ठोकल्या.
कुसल मेंडिस हा श्रीलंका क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. मेंडिसने श्रीलंकेकडून 44 कसोटी सामन्यांमध्ये 2995 धावा केल्या आहेत. तर 76 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 2167 धावा रचल्या आहेत. कुसलने 26 टी20 सामन्यांमध्ये 484 धावाही ठोकल्या आहेत. कोविड लॉकडाऊननंतर मैदानात उतरलेल्या प्रशिक्षण शिबिराचा तो भाग होता.