गाले । चेतश्वर पुजाराचे (153) शानदार शतक, अजिंक्य रहाणे (57), पदार्पणालाच अर्धशतक ठोकणार्या हार्दिक पंड्याच्या 50 धावांमुळे भारताने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात श्रीलंकेविरुद्ध 600 धावांचा डोंगर रचला. या मोठ्या धावसंख्येच्या दडपणामुळे श्रीलंकेची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान संघाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 154 धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा संघ 446 धावांनी पिछाडीवर असून ते फॉलोऑनच्या संकटात आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजावर अंकुश ठेवला. दिवसअखेर मोहम्मद शमीने दोन, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट मिळवली होती. त्याआधी 399 धावसंख्येवरून डावाची सुरुवात करताना भारतीय फलंदाजांनी त्या धावसंख्येत 201 धावांची भर टाकली. पहिल्या दिवशी 144 धावांवर नाबाद राहिलेल्या पुजाराला गुरुवारी फक्त 9 धावांची भर घालता आली. रहाणे बाद झाल्यावर रविचंद्रन अश्विन (47) आणि रिद्धमान सहाने (16) सहाव्या विकेट्साठी 59 धावांची भागीदारी केली. जडेजाने फक्त 15 धावा केल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना तीन षटकार ठोकत 30 धावा केल्या. उमेश यादव 11 धावांवर नाबाद राहिला.
द्विशतकांचा बादशहा समजल्या जाणार्या चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत तीन द्विशतके केली आहेत. पण विशेष म्हणजे यापैकी एकही द्विशतक परदेशात झालेले नाही. त्यामुळे या कसोटीत पुजाराने दीडशतकी खेळी केल्यावर त्याच्याकडून द्विशतकाची अपेक्षा बाळगली गेली. दुदैवाने तो 153 धावांवर बाद झाला. त्यामुळे परदेशातील पहिल्या द्विशतकाची त्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. पुजाराने याआधी नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमध्ये वैयक्तिक सर्वाधिक 212 धावांची खेळी केली, दुसरे द्विशतक मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादमध्ये झळकवले. या सामन्यात त्याने 204 धावा केल्या. पुजाराने रांचीमध्ये यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 202 धावा केल्या होत्या. याआधी पुजारा तीन वेळा दीडशे धावांचा टप्पा पार केल्यावर बाद झाला होता. पुजारा 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 159, 2013 मध्ये जोहान्सबर्गमध्ये आफ्रिकेविरुद्ध 153 धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव सर्वबाद 600 (चेतेश्वर पुजारा 153, अजिंक्य रहाणे 57, हार्दिक पंड्या 50, रविचंद्रन अश्विन 47. गोलंदाजी – नुवान प्रदीप 31-2-132-6, लाहिरु कुमारा 25.1-3-131-3, दिलरुवान परेरा 30-1-130, रंगना हेरथ 40-6-159-1, धनुष्का गुणतलिका 7-0-41.
श्रीलंका : पहिला डाव 5 बाद 154 ( उपुल थरांगा 64, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे 54. गोलंदाजी : मोहम्मद शमी 9-2-30-2, उमेश यादव 8-1-50-1, रविचंद्रन अश्विन 18-2-49-1).
पहिला भारतीय फलंदाज
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या 4 जून रोजी झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने सलग तीन षटकार ठोकत सनसनाटी निर्माण केली होती. कर्णधाराच्या पसंतीस उतरलेल्या हार्दिकला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचाही हार्दिकने पुरेपूर फायदा उचलत एक नवा उच्चांक नोंदवला. गॉलेच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्याच्या दुसर्या दिवशी हार्दिकने 49 चेंडूंत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 102.04 च्या सरासरीने 50 धावा केल्या. या खेळीमुळे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तीन षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. या खेळीत एका विक्रमाने हार्दिकला हुलकावणी दिली. वेगवान अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम मात्र हार्दिकला मोडता आला नाही. हार्दिकने 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकच्याआधी 1934 मध्ये पाटीयला संस्थानाच्या युवराजांनी इंग्लंडविरुद्ध फक्त 42 चेंडूत अर्धशतक झळकवले होते.