श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

0

कोलंबो: श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या संसदेने नवनियुक्त पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे. विरोधकांनी राजपक्षे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर आज मतदान झाले. यामुळे सिरिसेना यांना मोठा झटका बसला आहे.

पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाला संसदेनं मंजुरी दिल्याची घोषणा सभापती कारु जयसूर्या यांनी केली. ‘सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. त्यावर आवाजी मतदान घेण्यात आलं. त्यात संसदेनं सरकारविरोधात मतदान केलं. त्यावेळी राजपक्षे समर्थक संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. सरकारविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे,’ असं जयसूर्या यांनी सांगितलं.

काल राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला होता. संसद भंग करण्याचा सिरिसेना यांच्या आदेशाविरोधात न्यायालयानं निकाल दिला. सिरिसेना यांच्याकडून सुरू असलेल्या निवडणुकीच्या तयारीलादेखील न्यायालयानं ब्रेक लावला. सिरिसेना यांनी 26 ऑक्टोबरला पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरुन हटवलं. यानंतर त्यांनी राजपक्षे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.