जिलोंग : असेला गुणरत्नेच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर श्रीलंकाने दुसर्या टी20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. गुणरत्नेने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढत केवळ 46 चेंडूत नाबाद 84 धावांचा तडाखा दिला. त्याने सहा चौकारांसह 5 षटकारांची आतषबाजी केली. या आधी झालेल्या पहिल्या टी20 सामन्यातही चमारा कपुगेदराने अखेरच्या चेंडूवरच चौकार लगावत संघाला विजयी केले होते. विशेष गोष्ट अशी की, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियन जमिनीवर 5 टी 20 सामने खेळताना अद्याप एकही पराभव स्वीकारलेला नाही. लंकेला अखेरच्या चार षटकात 52 धावांची गरज होती. परंतु, गुणरत्नेने तुफानी हल्ला करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जबरदस्त चोपले. त्याने मोईजेस हेन्रिक्सला सलग तीन षटकार, एक चौकार आणि त्यानंतर अँड्रयू टाय टाकत असलेल्या अंतिम षटकात दोन चौकार व एक षटकार ठोकला. यानंतर मालिकेतील अखेरच्या टी20 सामन्यातही बाजी मारुन कांगारुंना क्लीन स्वीप देण्याचा लंकेचा प्रयत्न असेल.