श्रीलंकेला पावसाचा तडाखा, 91 मृत्यू

0

कोलंबो : भारतात मान्सूनची प्रतीक्षा सुरू असतांना तिकडे श्रीलंकेत पावसाने थैमान घातले आहेत. पहिल्याच पावसातच श्रीलंकेमध्ये तब्बल 91 नागरिकांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशा प्रकारे पावसामुळे पूर आणि भूस्खलन यामुळे श्रीलंकेचे नुकसान वाढतच आहे. मुसळधार पावसामुळे श्रीलंकेतील जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. प्रशासनाने तातडीने बचावकार्याला आरंभ केला असून, पुरामध्ये अडकलेल्यांना वायुसेना आणि नौदलाच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सुमारे 8 हजारांहून अधिक नागरिक या पावसामुळे बेघर झाले आहेत. दरम्यान, यंदाचा मान्सून आक्रमक असेल, असे संकेत यानिमित्ताने प्राप्त झाले आहेत.

भारताने दिला तातडीने मदतीचा हात
श्रीलंकेत अनेक भागांत गुरुवारपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे उपमंत्री दुनेश गानकानडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 110 पेक्षा जास्त जण बेपत्ता नोंदविले आहेत. गुरुवार व शुक्रवार मिळून देशात 300 ते 500 मिमी पाऊस झाला. काही भागात तर 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीलंकेचे हवाई दल आणि नौदलाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या माध्यमातून मदत करीत आहेत. सन 2003 ला पावसाने व भूस्खलनाने देशातील दक्षिण भागात 250 नागरिकांचा बळी घेतला होता. दरम्यान, श्रीलंकेला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय नौदलाने बंगालच्या खाडीत असलेली आपली युद्धनौका आयएनएस किर्च ही कोलंबोच्या दिशेने रवाना केली आहे. या युद्धनौकेद्वारे पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचे साहित्य पाठवण्यात आले आहे. शिवाय औषधे, कपडे आणि पिण्याचे पाणीही पाठवण्यात आले आहे.