लंडन । आयसीसीच्या 2019 विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्याच्या निकषांमध्ये अखेर श्रीलंकेने बाजी मारली आहे . इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे एककाळी जगज्जेता मानला जाणारा वेस्ट इंडिजचा संघ आगामी विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यास अपयशी ठरलाय. वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा श्रीलंकेला झाला असून, श्रीलंकेचा संघ आगामी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार जागतिक क्रमवारीत पहिल्या आठसंघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांची कामगिरी पाहता, शेवटच्या स्थानासाठी या दोन्ही संघांमध्ये चुरस होती. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे वेस्ट इंडिज श्रीलंकेला क्रमवारीत मागे टाकणे आता जवळपास कठिण असल्याचे समजले जातेय. या आधारावरच श्रीलंकेला विश्वचषकात थेट प्रवेश देण्यात आला आहे.
वेस्ट इंडिजच्या संघाला थेट प्रवेश मिळवता आला नसला तरीही त्यांच्यासाठी विश्वचषक स्पर्धेचे दरवाजे अद्याप बंद झालेले नाहीत.पुढच्या वर्षी होणार्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत पहिल्या दोन स्थानांवर वेस्ट इंडिजचा संघ राहिल्यास त्यांना 2019 साली इंग्लंड येथे होणार्या विश्वचषकात प्रवेश मिळू शकेल, असं आयसीसीने स्पष्ट केलंय. वेस्ट इंडिजला आता अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, आयर्लंड या तळातल्या संघांशी दोन हात करावे लागणार आहेत. यात पहिल्या दोन स्थानांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ राहिल्यास त्यांना आगामी विश्वचषकात प्रवेश मिळू शकणार आहे.