नवी दिल्ली । केरळ उच्चन्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अपिल करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्यामुळे शांताकुमार श्रीशांतच्या राष्ट्रीय क्रिकेटमधील परतण्याच्या आशेवर पाणि फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केरळ उच्चन्यायालयाने श्रीशांतवरील आजीवन बंदी हटवण्याचा निर्णय दिल्यामुळे स्पॉटफिक्सींग प्रकरणात अडकलेला हा वेगवान गोलंदाज यंदाच्या मोसमात पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. आयपीएलच्या 2013 मधील सत्रात स्पॉटफिक्सींग प्रकरणात अडकल्यामुळे बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंदी घातली होती. गत सोमवारी केरळ उच्चन्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपिठाने श्रीशांतवरील आजीवन बंदी हटवण्याचे आदेश दिले होते.
श्रीशांत नाराज
केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात बीसीसीआय अपिल करणार असल्याचे समजल्यावर श्रीशांत नाराज झाला आहे. त्यावर ट्विट करताना श्रीशांत म्हणाला की, मी तुमच्याकडे भिक मागत नाही. मी माझ्या जगण्याचे साधन मागत आहे. ज्यावर माझा अधिकार आहे. तुम्ही देवापेक्शा मोठे नाहीत. मी पुन्हा खेळणारच.????? वारंवाव निर्दोष ठरल्यावर तुम्ही असे का वागताय तेच कळत नाही.
मात्र, बीसीसीआयने श्रीशांतला पुनरागमन करण्याची संधी न देण्याच्या मुद्यावर ठाम आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेेल्या माहितीनुसार, मंडळाच्या कायदे सल्लागारांनी केरळ उच्चन्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास केला आहे. त्यात केरळ उच्चन्यायालयाच्या वरिष्ठ खंडपिठाकडे जाण्याचा मार्ग आहे.त्यामुळे बीसीसीआयने या निर्णायाच्या विरोधात अपिल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सध्या शून्य सहिष्णुता नितीवर काम करत आहे. त्यामुळे भारतासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 क्रिकेट सामने खेळलेल्या श्रीशांतला बीसीसीआयकडून सहानभुती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.