श्रीशांतने उलगडले रहस्य

0

नवी दिल्ली । भारतीय संघातील चर्चित खेळाडूंमध्ये समाविष्ट असलेल्या शांताकुमार श्रीशांतचे जीवनात आयपीएलच्या 2013मधील सामन्यांनी मोठी ऊलथापालथ केली. श्रीशांतला स्पॉटफिक्सिंगमध्ये सहभागी असल्याच्या कारणामुळे कारागृहातही मुक्काम करावा लागला होता. या आरोपांमधून श्रीशांत आता दोषमुक्त झाला आहे. त्यामुळे ज्या कारणांमुळे तो विविध तपास यंत्रणांचे प्रश्‍न आणि संशयाच्या भोवर्‍यात सापडला होता त्या कारणांचा ऊलगडा श्रीशांतने आता केला आहे. आयपीएलच्या सामन्यादरम्यान ट्राऊझरला लावलेल्या रुमालाबाबत खुलासा करताना श्रीशांत म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्ड हा त्याचा गोलंदाजीतला आदर्श आहे. त्यामुळे त्याची नक्कल करताना डोनाल्डप्रमाणे पाठच्या बाजूला ट्राऊझरला रुमाल खोचला होता. पण, लोकांनी या गोष्टींचा संबध कुठल्याही गोष्टींशी जोेडला. सामन्यानंतर मला दोषी ठरवण्यात आले. केवळ त्या सामन्यातच नाही, त्याआधीही अनेकदा पाठीमागे रुमाल लावून गोलंदाजी केली होती.

अम्पायरची घेतली होती परवानगी
सामन्याच्या दरम्यान पाठिमागे रूमाल लावण्याची पंचाकडून परवानगी घेतली होती असे श्रीशांत म्हणाला. श्रीशांत म्हणाला की, त्या सामन्यात कुमार धर्मसेना अंपायर होते. त्यांनी परवानगी दिल्यावरच रूमाल पाठिमागे लावून मी गोलंदाजी केली. हे संभाषण स्टंपमधील मायक्रोफोनमध्ये रेकॉर्ड झाले असेल. कोणाची नक्कल करणे चुकीचे आहे का? डोनाल्डप्रमाणे मी पण चेहर्‍यावर झिंक ऑक्साइड मोठ्या प्रमाणात लावायचो. त्याचा अर्थ ते सामनेही फिक्स होते असा काढायचा का?

जनार्दन नावाच्या बुकीशी जवळीक
आयपीएल 2013 मधील स्पॉटफिक्सिंगमधील कथीत आरोपांमुळे श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. जनार्दन नावाच्या बुकीशी जवळीक असल्याचा आरोप श्रीशांतवर करण्यात आला. जनार्दनने आयपीएलमधील सामन्यांच्या दरम्यान विशिष्ट धावासांठी पैसे देण्याचे श्रीशांतला कबूल केले आणि त्याला इशारा देण्यासाठी श्रीशांतने ट्राऊझरला रूमाल लावल्याचा आरोप करण्यात आला होता.

दुसरे जीवनदान
केरळ उच्च न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी बीसीसीआयने श्रीशांतवर केलेली आजीवन बंदीची कारवाई रद्दबातल ठरवली होती. मागील चार वर्षांपासून बंदीची कारवाई सहन करणार्‍या श्रीशांतला केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दुसरे जीवनदान मिळाले असल्याचे बोलले जाते. या निर्णयानंतर, देव खूप दयाळू असल्याचे ट्विट श्रीशांतने केले होते.