नवी दिल्ली । स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंतच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. श्रीसंतच्या खेळावरील घातलेली बंदी उठवण्यासंदर्भातील केलेले अपील बीसीसीआयने फेटाळून लावले आहे. बीसीसीआय कोणताही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असेही बीसीसीआयने पत्र लिहून श्रीसंतला कळवले आहे. श्रीसंतने 2013च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात लावलेले प्रतिबंध हटवण्यासाठी प्रशासक समिती(सीओए)कडेही अपील केले होते. त्यानंतर बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी श्रीसंतला पत्र लिहून बंदी हटवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. क्रिकेट खेळण्याच्या बंदी विरोधात श्रीशांतने केरळ कोर्टात धाव घेतली होती. श्रीशांतवरील बंदी हटवणे शक्य नाही, अशी बाजू बीसीसीआयने कोर्टात मांडली.
आजीवन बंदी कायम राहील
बीसीसीआयने सूचित केल्याप्रमाणे श्रीसंतवर आजीवन बंदी कायम राहील आणि त्याला प्रतिस्पर्धी संघात खेळण्यासाठी स्वीकृती नसेल. त्यानं केरळच्या स्थानिक कोर्टातही बंदी हटवण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे, त्यालाही आमचे वकील उत्तर देतील, असे जोहरी यांनी म्हटले आहे. बीसीसीआयने भ्रष्टाचारविरोधात शून्य सहिष्णुतेची नीती वापरली आहे. कोणत्याही न्यायालयानं श्रीसंतला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त केलेलं नाही. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कनिष्ठ न्यायालयानं फेटाळून लावला आहे. ब्रिटेनच्या क्लब क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी श्रीसंत प्रयत्नशील असून, त्यासाठी बंदी उठवण्याची मागणी केली आहे. मात्र बीसीसआयने त्याच्यावरील बंदी उठवण्यास नकार दिला आहे.काही आठवड्यांपूर्वी श्रीशांतने क्रिकेट बोर्डाकडे पुन्हा नव्याने क्रिकेट खेळण्यासाठीची परवानगीची मागणी केली होती. केरळमधील एका स्थानिक क्रिकेट सामन्यात खेळण्याची श्रीशांतची इच्छा होती. पण बीसीसीआयने स्पष्ट विरोध दाखवला होता. याशिवाय श्रीशांतने परदेशात ट्वेन्टी-20 लीगमध्ये सहभागी होण्याचीही मागणी केली होती.
प्रकरणातून सुटका तरीही बंदी का?
25 जुलै 2015 साली दिल्लीच्या सत्र न्यायालयाने माझी स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणातून सुटका केली असली तरी क्रिकेट बोर्डाने घातलेली बंदी अद्याप का हटविण्यात आलेली नाही? असा सवाल उपस्थित करत श्रीशांतने कोर्टात आपली बाजू मांडली. श्रीशांतच्या या याचिकेला बीसीसीआयने स्पष्ट विरोध दर्शवला. श्रीशांतची कोर्टाने जरी मुक्तता केली असली तरी याचा परिणाम बोर्डाच्या प्रशासकीय समितीने घेतलेल्या निर्णयावर अजिबात होणार नाही. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने श्रीशांतवर बोर्डाच्या मान्यताप्राप्त सर्वच क्रिकेट स्पर्धांमध्ये बंदी घातली आहे. प्रशासकीय समितीच्या निर्णयानुसार श्रीशांतने क्रिकेट बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. फिक्सिंग, भ्रष्टाचार, सट्टेबाजी अशा आरोपांखाली तो दोषी आहे. कोर्टाने जरी श्रीशांत षडयंत्रात फसला गेला होता, असा निर्णय घेतला असला तरी त्याच्याविरोधातील पुराव्यांनुसार त्याने बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तो दोषी आढळतो, असे या निर्णयात म्हटले आहे.