श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये तीन नवीन विश्‍वस्तांची नेमणूक

0
 वेहेरगावातील ज्ञानेश्‍वर बोत्रे, ठाण्याचे अमरेश ठाणेकर व डोबिंवलीचे दत्तात्रय भोईर
 स्थानिक विश्‍वस्तांच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या वेहेरगाव येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये स्थानिक विश्‍वस्तांनी तीन नवीन विश्‍वस्तांच्या नियुक्त्या नुकत्याच केल्या आहेत. यामध्ये वेहेरगावातील भाविक म्हणून ज्ञानेश्‍वर रघुनाथ बोत्रे, महाराष्ट्रातील भाविक म्हणून ठाण्याचे अमरेश मधुसुदन ठाणेकर व कल्याण डोबिंवलीचे दत्तात्रय दगडू भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कळस चोरीपासून दोन गट
मागील वर्षी एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला गेल्यापासून श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये दोन गट पडले असून त्यांच्यामध्ये विश्‍वस्त पदावरुन वाद सुरु आहेत. याच वादातून दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील आठवड्यात अनंत तरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चार स्थानिक विश्‍वस्तांचे निलंबन केले असल्याचे म्हटले होते. तर आता स्थानिक विश्‍वस्तांनी सलग आठ मासिक सभांना गैरहजर राहिल्यामुळे अनंत तरे, मदन भोई, नवनाथ देशमुख व विलास कुटे या चार विश्‍वस्तांना निलंबित करुन नवीन तीन विश्‍वस्तांची नियुक्ती केली असल्याचे म्हटले आहे. या स्थानिक विश्‍वस्तांच्या वतीने नुकतीच पत्रकार परिषद घेत या नियुक्त्यांबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी देवस्थानचे सचिव संजय गोविलकर, उपाध्यक्ष काळूराम देशमुख, विश्‍वस्त पार्वतीबाई पडवळ, नवीन विश्‍वस्त ज्ञानेश्‍वर बोत्रे, अमरेश ठाणेकर, दत्तात्रय भोईर, देवस्थानचे नूतन सल्लागार अ‍ॅड. जयवंत देशमुख, माजी सरपंच गणपत पडवळ, मधुकर पडवळ, मिलिंद बोत्रे, युवराज पडवळ आदी उपस्थित होते.
अनंत तरे यांच्याकडून गैरव्यवहार
यावेळी बोलताना संजय गोविलकर व जयवंत देशमुख म्हणाले, मागील 27 वर्षापासून अनंत तरे या देवस्थानात विश्‍वस्त असून 21 वर्ष अध्यक्ष पदावर आहेत. मात्र त्यांनी याठिकाणी विकासाची कामे न करता पैशाचा व पदाचा गैरवापर केला. भाविक भक्त, विश्‍वस्त व ग्रामस्त यांच्यासमोर अडचणी निर्माण करुन त्रास देण्याचे काम केले. सोबतच्या विश्‍वस्तांवर दबाव टाकत एकतर्फी कारभार केला. मंदिराचा कळस चोरीला गेल्यानंतर ते मंदिराकडे फिरकले नाहीत. तसेच सलग आठ मिटिंगाला गैरहजर राहिल्याने घटनेच्या कलम 13 क प्रमाणे त्यांना पदावरुन कमी केले तर घटनेच्या कलम 9 ब च्या तरतुदीनुसार त्यांना व इतर चार जणांना विश्‍वस्त पदावरुन कमी केले आहे. त्यांच्या जागी नवीन विश्‍वस्तांची नियुक्ती करत तसा बदल अहवाल सहा. धर्मदाय आयुक्तांकडे सादर केला आहे
एकविरा देवस्थानच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाई करावी व न्यासाचे झालेले आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल व्हावे अशी मागणी पुणे धर्मदाय सहआयुक्त यांच्याकडे केली असल्याचे संजय गोविलकर व काळूराम देशमुख यांनी यावेळी सांगितले.