सव्वाशे दिंड्या व हजारो वारकर्यांची उपस्थिती ; आज व उद्या कीर्तन
मुक्ताईनगर- कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली या घोषाने तसेच टाळ-मृदुंगाच्या गजरात मुक्ताईनगरी दुमदुमली. मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षे कोथळी येथील पुरातन आदिशक्ती संत मुक्ताबाई मंदिरात संत मुक्ताबाई यांच्या 723 व्या अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावली. सकाळी महापूजा व कीर्तन झाले. प्रसंगी पुण्यभूमीत सव्वाशे दिंडींसह हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
दिवसभर धार्मिक कार्यक्रम
याप्रसंगी सकाळी विठ्ठल महाराज (पंढरपूर ) यांच्या हस्ते महापूजा अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमास आळंदीतील ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई यांनी पूजन केले. संत नामदेव महाराज यांचे 16 वे वंशज केशवदास महाराज यांचे मुख्य कीर्तन झाले. सर्व पादुकांचे पूजन आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरचे विश्वस्त अॅड. रवींद्र भैय्या पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी संदीप रवींद्र पाटील, पंजाबराव पाटील, हभप रवींद्र महाराज, हभप उद्धव महाराज जुनारे आदींसह संस्थांनचे अध्यक्ष जयंत गायकवाड तसेच विश्वस्त सबनीस, मुंदडा, जयंत महाराज, पांडुरंग पालखी सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे, व्यवस्थापक संभाजी देवकर, मेघराज वळखे पाटील, रुक्मिणी संस्थानचे अध्यक्ष नामदेवराव अमाळकर, विश्वस्त सदानंद साधु, सुरेश चव्हाण, निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे, विश्वस्त जयंत महाराज गोसावी, सचिव पवनकुमार भूतडा, आदिशक्ती संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज विठ्ठल महाराज नामदास, माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनीत सबनीस यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पांडुरंगाची पालखी रुक्मिणी मातेची पालखी तसेच संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे स्वागत रावेर लोकसभा मतदार संघाच्या नवनियुक्त खासदार रक्षा खडसे यांनी केल. आदिशक्ती संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळ्यानिमित्त कोथळी परीसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
31 रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता
यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संत मुक्ताई गुप्त होण्याला सव्वा साठ तपे पूर्ण झाली आहेत तसेच मुक्ताई मंदिर मेहूणच्या स्थापनेचे व वै.ह.भ.प. गुरूवर्य बंकटस्वामी महाराज यांच्या समाधीचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येणार असून वाचक हभप सुरेश महाराज तळवेलकर व हभप कडू महाराज जंगले वराडसीम आहेत. 29 रोजी रात्री महादेव महाराज राऊत, बीड यांचे कीर्तन झाले. त्यानंतर मुंबई येथील कलावंतांनी ‘मुक्ताई’ ही नाटिका सादर केली. 30 रोजी महान तपस्वी मौनीबाबा परभणीकर यांचे कीर्तन होणार असून शुक्रवार, 31 रोजी सकाळी 9 वाजता शारंगधर महाराज मेहूणकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी पालखीचे प्रस्थान होणार आहे.