श्री क्षेत्र पंढरपूरला विशेष दर्जा मिळावा

0

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले व श्री क्षेत्र पंढरपूरला पर्यटनाचा विशेष दर्जा मिळावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत तारांकीत प्रश्‍न उपस्थित करून केली. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून देशभरातील ऐतिहासिक किल्ले याच बरोबर तीर्थक्षेत्र स्थळांचा विकास पर्यटन मंत्रालय स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केला जातो. लोकसभेमध्ये या संदर्भात खासदार बारणे यांनी तारांकीत प्रश्न मांडला. केंद्र सरकारच्या पर्यटनाचा प्रसाद योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगपैकी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र घेतले असून, स्वदेश दर्शनमध्ये सिंधुदुर्ग समुद्र तटवर्ती भागाचा विकास पर्यटन क्षेत्र विकासासाठी घेतले आहेत.

पर्यटनमंत्र्यांकडून आश्‍वासन
श्री क्षेत्र पंढरपूर या तीर्थक्षेत्राला लाखोंच्या संख्येने भाविक भेट देतात. पंढरपूर या तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत घेण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. याच बरोबर महाराष्ट्रातील किल्ले व गडांचादेखील समावेश केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालय विरासत परिपत योजनेत करावा, अशी मागणी त्यांनी केली. बारणे यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्यटनमंत्री महेश शर्मा म्हणाले, श्री क्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी विशेष योजनेमध्ये पंढरपूरला सहभागी करून विकास केला जाईल. तसेच किल्ल्यांचा विकास करण्याचा मानस केंद्र सरकारचा असून, या बाबत स्वत: पंतप्रधान लक्ष घालत आहेत. किल्ले विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष सहाय्य केले जाणार असल्याचे पर्यटन मंत्र्यांनी लोकसभेमध्ये आश्वासन दिले.