यावल- श्री क्षेत्र मनुदेवी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुडगूस घालत सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली. आडगाव येथून सातपुड्यात काही अंतरावर श्रीक्षेत्र मनुदेवी असून या तीर्थक्षेत्रावर पूजा साहित्यासह खेळणी तसेच अन्य व्यावसायीकांनी दुकाने थाटली आहेत. सोमवारी रात्री दुकानदार आपापली दुकाने बंद करून गावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधली. दुकानदार विश्वदीप पाटील, गोपाळ पाटील, निलेश पाटील, शशिकांत कोळी, छोटी तडवी, सोनु पाटील यांच्या दुकानातील सामानावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने सुमारे 50 हजारांवर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. यावल पोलिसात मात्र तक्रार दाखल नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.