हजारो भाविकांनी फुलला मुक्ताई भक्तीचा मळा
भुसावळ- महाशिवरात्रीच्या महापर्वावर मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मेहणिं तापीतिरी येथील आदिशक्ती संत मुक्ताई तिर्थक्षेत्राला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील 70 दिंड्या हजारो भाविकांसह दाखल झाल्या. संत मुक्ताईचे गुप्तस्थान मेहूण तापीतीर मुक्ताई भक्तीच्या मळ्याने फुललेले दिसत आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम व मुक्ताई शरणमच्या जयघोषाने मेहूण तिर्थक्षेत्र दुमदूमत आहे. मुक्ताईनगरातही शेकडोवर दिंड्या दाखल झाल्या आहेत.
श्री क्षेत्र मेहुणला महोत्सव
श्री क्षेत्र मेहूण तापीतीर येथे शुक्रवार, 9 ते बुधवार, ि14 फेब्रुवारी 2018 दरम्यान महाशिवरात्री महोत्सव सुरु आहे. महाशिवरात्री महोत्सवासाठी महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून तसेच आजुबाजूच्या राज्यातील दिंड्यांचे आगमन शनिवार, 10 रोजी दुपारी 12 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम, मुक्ताई शरणम् मुक्ताई शरणम्, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम’ या जयघोषात, पावल्या टाकत मोठ्या जल्लोषात झाले. तत्पूर्वी या दिंड्या मेहूण-चिंचोल येथे आल्या असता तेथे यज्ञेश्वर आश्रमातर्फे हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर चिंचोल ग्रामस्थातर्फे सर्व दिंड्यांमधील हजारो पायी वारकर्यांना श्रीराम मंदिरासमोर भोजन देण्यात आले. त्यानंतर या दिंड्या श्रीक्षेत्र मेहूणकडे रवाना झाल्या. या दिंड्यांचे स्वागत श्रीक्षेत्र मेहूण देवस्थानातर्फे हभप रामराव महाराज, लक्ष्मण महाराज, अमोल राऊत महाराज, संचित पाटील महाराज मेहूणकर यांनी केले. संत आदिशक्ती मुक्ताईंच्या मंदीराला प्रदक्षिणा घालून व तापीमातेचे तिर्थ घेत एकेका दिंडीतील भाविकांनी आदिशक्ती संत मुक्ताईंचे दर्शन घेतले. त्यानंतर दिंड्या नेमून दिलेल्या ठिकाणी विसावल्या.
काल्याच्या कीर्तनाने होणार समारोप
हा उत्सव 14 फेब्रुवारी 2018 पर्यंत चालणार असून काल्याच्या कीर्तनाने उत्सवाचा समारोप होणार आहे. संपूर्ण महाशिवरात्रोत्सवात दिंडी चालकांची कीर्तने होणार आहे. रविवार, 11 रोजी पहाटे श्री संत मुक्ताईंचा महाभिषेक, महापूजा व महाआरती करण्यात येणार आहे. एकादशीनिमित्त मेहूण-चिंचोल ग्रामस्थांतर्फे मोफत फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. बुधवार, 14 रोजी काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्री उत्सवाचा समारोप होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाशिवरात्री महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.