चाळीसगाव- शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर पाटणादेवी रस्त्यावर असलेल्या श्री क्षेत्र वालझिरी परीसरात कुत्र्याच्या हल्ल्या हरीण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजता सीमा विठ्ठल झोडगे यांच्या शेताजवळ घडली. हा परीसर गौताळा अभयारण्याला लागून असल्याने या परीसरात हरणांचा मोठा वावर आहे. सध्या जंगलात पिण्याचे पाणी व पुरेसे अन्न मिळत नसल्याने त्यांच्या शोधात हे वन्य प्राणी जंगलाबाहेर पडतात ही वस्तुस्थिती आहे. सध्या या भागात कुत्र्यांचा हैदोस शहरासह जंगल परीसरात वाढल्याने बुधवारी सकाळी दहा वाजता कुत्र्यांच्या झुंडीने तीन वर्ष वयाच्या हरणावर हल्ला केला. त्यात हे हरीण जखमी झाले आहे. यावेळी सीमा झोडगे भैशय्या पाटील व कार्यकर्त्यांनी हरणाची कुत्र्यापासून सुटका केली व त्याच्या जखमेची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. जखमी हरणाच्या मानेजवळ कुत्र्यांनी हल्ला केला असल्याने हरीण भेदरलेले आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी धनंजय पवार यांच्यासह वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.