श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर ३२५ कोटींचे कर्ज

0

नियोजनाअभावी कारखाना आला डबघाईला : ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली वादळी

बारामती । इंदापूरच्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये हाणामारीचे दोन वेळा प्रसंग आले. त्यावेळी दोघेही समोरासमोर भिडले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पसरले होते. परंतु काही सभासदांनी समंजसपणा दाखवत नमते घेतले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर ३२५ कोटींचे कर्ज असून नियोजनामुळे कारखाना डबघाईस आला आहे. या कारखान्याचा इतर कारखान्यांप्रमाणे लिलाव होऊ देणार नाही. अखेरच्या श्‍वासापर्यंत छत्रपती साखर कारखाना हा सभासदांचाच राहील. यासाठी निकराचा लढा देऊ असे कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी घणाघाती आरोप करत सभासदांना आवाहन केले.

चालू हंगामासाठी २,७२५ रुपयांचा दर
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामासाठी २५११ रुपये प्रति टन व चालू हंगामासाठी २,७२५ रुपयांचा दर जाहीर केला. याबाबतची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी केली. कारखान्यास ५६ कोटींचा तोटा झाला असून तो हमीभाव देण्यासाठी झाला आहे. २०१४-१५ व १६-१७ या हंगामासाठी २१ कोटींचे कर्ज केंद्रशासनाकडूनच मिळाले होते. तसेच पुन्हा एकदा १७ कोटींचे कर्ज केंद्राकडूनच मिळाले होते. कारखान्याच्या विस्तारवाढीचा खर्च हा १५१ कोटी आहे. त्यापैकी १२५ कोटी राज्य सहकारी बँक व जिल्हा बँक यांच्याकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे दरमहा २ कोटींचे व्याज या बँकांना द्यावे लागणार आहे. कारखान्याची वसुली घटल्यामुळे कारखान्यास तोटा झाला आहे. तसेच १३० प्रतिटन कपात केलेली रक्कम परत द्यावी लागली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी यावेळी दिली.

कारखान्याला कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न
कारखान्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची गरज आहे. कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना ४८ हजार ५०० रुपये प्रतिमाह देण्याचे ठरले असताना प्रत्यक्षात मात्र १ लाख ११ हजार रुपये पगार दिला जातो. ही सभासदांची लूटच आहे. या कारखान्याला कर्जबाजारी करून यशवंत किंवा भिमा पाटस या कारखान्यासारखी अवस्था करण्याचा प्रयत्न दिसतो आहे, अशी टिका पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर, तानाजीराव थोरात, सतिश काटे, अ‍ॅड. संभाजीराव काटे आदी सभासदांनी यावेळी केली. कारखान्यावरील कर्ज प्रत्यक्षात ३२५ कोटी असून संचालक मंडळ कर्जाचा आकडा दडवत आहे. कारखान्यात अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती कर्मचारी व अधिकार्‍यांच्या जागा रिक्त असताना तसेच या कारणामुळे नोकरभरती करू नये, असा सक्तिचा आदेश असताना बेकायदेशीरपणे भरती सुरू आहे. हा अनुशेष भरल्याशिवाय भरती करता येणार नाही, असे पिंगळे यांनी सांगितले.

सत्ताधारी व विरोधी एकमेकांना भिडले
कारखान्याच्या मालकीचे दोन गाळे ६० लाख रुपयांना विकले ही गंभीर बाब आहे. कारखान्यात भ्र्रष्टाचाराची मालिका सुरू असून संचालक मंडळ दिशाभूल करीत आहे. उधळपट्टी करणे हा कारखान्याचा कारभार आहे. चालू वर्षात सल्लागारासाठी १७ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र, मागील वर्षी ७ लाखच खर्च झाले होते. मग १० लाख वाढीव कशासाठी असा सभासदांनी प्रश्‍न विचारला. दरम्यानच्या काळात वसुलीच्या सुनावणीसाठी वकीलाला न पाठवता संचालक प्रदिप निंबाळकर यांना का पाठविले व त्यांनी किती खर्च केला? असा प्रश्‍न अ‍ॅड. संभाजी काटेंनी विचारला असता व्यासपिठावरून संचालक प्रदिप निंबाळकरांनी दमदाटी केली. यावरून सभासदांमध्ये गोंधळ निर्माण झाला. व येथेच सत्ताधारी गट व विरोधी गट एकमेकांना भिडले. परंतु जेष्ठ संचालकांनी समजूत घालून पुन्हा सभेस सुरूवात झाली.

भंगार विक्रीचा निर्णय परस्पर विषय क्र. १ व २ वर तब्बल ५ तास चर्चा सुरू होती. व शेवटच्या दोन मिनिटात उर्वरित आठ विषय मंजूर करण्यात आले. मात्र, या पाच तासांच्या चर्चेत कारखान्यातील कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढण्यात आले. विरोधकांच्या प्रश्‍नांना कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह उर्फ बाळासाहेब घोलप यांनी सविस्तर उत्तर दिले. मात्र काही प्रश्‍नांची उत्तरे देताना त्यांना माघार घ्यावी लागली. कारखान्यात कुशल अधिकारी व कर्मचारी यांची भरती करताना आजूबाजूच्या परिसरातील चार खासगी साखर कारखान्यातील अनुभवी कामगारांचे अर्ज आले होते. मात्र, हा कुशल कामगार डावलून भरती करण्यात आली. यामागे खासगी साखर कारखान्यांच्या मालकांचा दबाव होता का व त्या दबावास संचालक मंडळ बळी पडले का? असा खडा सवाल पृथ्वीराज जाचक यांनी केल्यानंतर सभागृहात शांतता पसरली. यावरून पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्यातील भंगारातील विक्रीचा परस्पर घेतलेला निर्णय हा भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना असून कमी दर्जाचे साहित्य सहवीज निर्मिती प्रकल्पात व कारखान्याच्या विस्तार वाढीत वापरले गेल्याचे सांगण्यात आले.

१० लाख टन ऊसाचे गाळप
इतर कारखान्याच्या तुलनेत सभासदांना दर दिले जातील. यापुढील काळात योग्य त्या प्रमाणात खरेदी करण्यात येईल व त्यासाठीचे दर हे योग्य असतील याची निश्‍चितपणे दक्षता घेतली जाईल. चालू गळीप हंगामात १० लाख टन ऊसाचे गाळप करण्याचा निर्धार असून त्या दृष्टिने संचालक मंडळ निश्‍चितपणे प्रयत्न करेल. तसेच कारखान्यास ऊस न घालणार्‍या सभासदांना सवलतीची साखर पुढील पाच वर्षात दिली जाणार नाही, अशी ग्वाही अध्यक्ष बाळासाहेब घोलप यांनी दिली. कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, मारूतीराव चोपडे, विश्‍वनाथबुवा गावडे, आमदार दत्तात्रय भरणे, तात्यारामबापू शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, बाळासाहेब कोळेकर, बाळासाहेब शिंदे, शिवाजीराव निंबाळकर, तानाजी थोरात, अ‍ॅड. संभाजी काटे, डि. के. सपकळ, अशोक काळे, शिवाजीराव निंबाळकर, आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.