लोणावळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर जगभरात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार झाला. बौद्ध धर्म हा शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देणारा धर्म असल्याने या बौद्ध धर्माचा भिक्खू संघाने जगभरात प्रचार व प्रसार करावा, असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ऑल इंडिया भिक्खू संघ यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म महाअधिवेशनात आठवले बोलत होते. या महाअधिवेशनात 22 देशातील धर्मगुरु व प्रतिनिधी सहभागी झाले होते.
…संविधानामुळे जातीय सलोखा
यावेळी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मावळचे आमदार बाळा भेगडे, भदंत महाबोधी डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत पघ्यादीपजी, भदंत विरत्न थेरो, भदंत विनय बोधी थेरो, रिपाईचे प्रदेश महामंत्री अविनाश म्हातेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सुनील शेळके, नगरसेवक दिलीप दामोदरे आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आठवले यांनी भारत हा हिंदू देश असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे या देशात सर्व जाती पातीचे लोक एकत्र नांदत असल्याचे प्रतिपादन केले.
…गया येथे बुद्धविहारासाठी मदत
याचवेळी त्यांनी ऑल इंडिया भिक्खू संघाचे मुख्यालय असलेल्या गया येथे 25 कोटी रुपयांचे अद्यावत बुद्धविहार उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची आज गरज आहे असे मत व्यक्त केले. मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी यावेळी मावळ तालुक्यातील देहूरोड येथील दिक्षाभूमी व तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या विकासासाठी कालच महाराष्ट्र शासनाने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले. या महाअधिवेशनाचे आयोजक भदंत डॉ. राहुल बोधी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.