श्री नाना गणेश मंडळातर्फे पाण्याच्या टाकीत विसर्जन

0

नवापूर । शहरातील गुज्जर गल्लीतील श्री.नाना गणेश मंडळातर्फे नवोपक्रम राबविण्यात येत असुन या मंडळाने यावर्षापासून सर्वप्रकारच्या प्रदूषणाला आळा घालून इको-फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. आता दरवर्षी इको-फ्रेंडली मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प मंडळातर्फे करण्यात आला आहे. मंडळाच्यावतीन विसर्जन मिरवणूक न काढता व गुलाल न उधळता जागीच पाण्याच्या टाकीत विसर्जन करण्यात येणार आहे. अशा प्रकारची भावना नाना गणेश मंडळाचा गणेश भक्तांनी जनशक्तीशी बोलतांना व्यक्त केली.

सामाजिक जाणिवांचा जागर

आजच्या तरुणांमध्ये अशी भावना असणे ही एक सामाजिक जाणिवेचे प्रतीक आहे…! नवापूर शहरातील प्रथितयश मंडळ म्हणुन श्री नाना गणेश मंडळाचा नावलौकीक आहे. गेल्या 27 वर्षांपासुन आकर्षक मुर्ती,आरस,वेशभुषा,मिरवणुक,यासाठी हे मंडळ प्रसिध्द आहे. मंडळ छोटे पण नाव मोठे आहे असे हे मंडळ आहे. या मंडळातील तरुणांनी एकत्र येऊन बैठक घेतली 2017 या वर्षांपासून मंडळातर्फ काही तरी नवीन करावे. समाजाला एक दिशा मिळावी,सुखकर्ता विघ्नहरर्त्याला आवडेल ते करावे हा समर्पक व नवीन विचार व उद्देश ठेऊन तरुणांनी चर्चा केली. पर्यावरणाची हानी,ग्लोबल वार्मिग,जागतिकतापमान,जलप्रदुषण,ध्वनी प्रदुषण,वायु प्रदुषण इत्यादी बाबीचा विचार करण्यात आले. विचार मंथन झाले व यावर्षांपासुन शाडु मातीचा इको फ्रेडली गणेश मुर्तीची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. श्रींची मुर्ती फक्त पाच फुट असून निलवर्णाची आहे. मुर्तींचे स्वरुप गुरुदत्ताचे आहे. मंडळातर्फ कोणते ही प्रदुषण न करता मंडळाजवळच पाण्याची टाकी करुन त्यात विसर्जन करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी संजय दुसाणे यांनी दिली. नाना गणेश मंडळाचा या स्तुत्य व समाज प्रबोधन उपक्रमाचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे. प्रत्येक गणेश मंडळाला प्रेरणा देणारा हा उपक्रम सर्वाना सकारात्मक संदेश देत आहे.