कोच्चीः देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून श्री पद्मनाभस्वामी मंदिराकडे पहिले जाते. मंदिराची संपत्ती 2 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. तेथील संपत्तीच्या कारभारासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. आठ वर्षापासून कोर्टात सुनावणी सुरु होती. श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या माजी राजघराण्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती सध्या मंदिराची व्यवस्था पाहणार आहे. ५००० हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर असल्याचा दावा इतिहासकार करतात.
२०११मध्ये केरळ उच्च न्यायालयाने पद्मनाभस्वामी मंदिराच्या हक्क आणि संपत्तीबाबत मोठा निर्णय देताना राज्य सरकारला अधिकार दिले होते. केरळ हायकोर्टाच्या या आदेशास माजी त्रावणकोर राजघराण्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 8 वर्षांहून अधिक काळ सुनावणी सुरू होती. एप्रिलमध्ये या प्रकरणातील झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती ललित आणि न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला. अखेर सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोर घराण्याला दिली आहे.