श्री क्षेत्र कोथळीत 10 रोजी श्री संत मुक्ताई 721 व्या अंतर्धान समाधी सोहळा
मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताई 721 व्या अंतर्धान समाधी सोहळा 10 रोजी श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे साजरा आहे. या निमित्ताने सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परंपरेने पंढरपूर येथून साक्षात श्री पांडूरंग परमात्मा पादुका मंगळवारी मुक्ताईकडे निघाल्या आहेत. बुधवारी भगवान पाडुरंगाच्या पादुका दिंडी सोहळा दुपारी जामनेर तर सायंकाळी भुसावळ येथे दाखल होणार आहे. संत नामदेव महाराज व त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पादूका पालखी दिंडी सोहळेदेखील मुक्ताईनगरकडे येत आहेत. सोमवारी पंढरपूर येथे विधीवत पूजन करून श्री पांडूरंग दिंडी सोहळा पहिल्या औरंगाबाद मुक्कामी आला. मंगळवारी हा सोहळा औरंगाबाद येथून मुक्ताईनगर कडेप्रस्थान झाला असूने सोहळ्यात मुक्ताई फडासह अनेक वारकरी सामील झाले आहेत.
जामनेरात आज पांडूरंग व नामदेव महाराज पादुका भेट सोहळा
औरंगाबाद येथून निघालेल्या श्री पांडूरंग परमात्मा पादुका दिंडी सोहळा व संत नामदेव महाराज पालखी भेट सोहळा जामनेर येथे बुधवार, 9 रोजी दुपारी 12 वाजता रंगणार आहे. नगराध्यक्षा साधना महाजनसह स्थानिक परीसरातील वारकरी स्वागत करतील. सावता महाराज मंदिरात भाविक दर्शनासाठी विसावा होईल. जामनेरवरून श्री संत नामदेव महाराज दिंडी सोहळा बोदवडमार्गे मुक्ताईनगर येथे सायंकाळी दाखल होणार आहे.
भुसावळात पांडुरंग पादुका मुक्कामी
जामनेर येथून श्री पांडूरंग पालखी सोहळा भुसावळ कडे रवाना होवून ठिकठिकाणी स्वागत स्वीकारून जामनेर नाका, भुसावळ येथे पांडूरंग व संत निवृत्तीनाथ दिंडी भेट सोहळा बुधवारी सायंकाळी पाच वाजता होईल. नगराध्यक्ष रमण भोळे, विठ्ठल मंदिर वार्डाचे विश्वस्त, झेंडूजी महाराज बेळीकर गादीपती भरत महाराज पाटील पालखी पूजन करतील. भुसावळ शहरातून मिरवणुकीने दोन्ही सोहळे विठ्ठल मंदिरात दाखल होतील. येथेच पांडुरंग पादुका मुक्काम होईल तसेच संत निवृत्तीनाथ पादूका पालखी सोहळा वरणगाव मुक्कामी रवाना होईल. गुरुवार 10 रोजी मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा निमित्ताने संत नामदेव महाराज यांचे विद्यमान 16 वे वंशज यांचे पुष्पवृष्टीचे कीर्तन दुपारी 11 ते दीड दरम्यान होईल. या सोहळ्यात अनेक संस्थानाचे विश्वस्त भाविक उपस्थित राहतील.
पालखी सोहळ्यात सहभागाचे आवाहन
भुसावळ जामनेरच्या भाविकांनी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होवून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर वार्ड विश्वस्त मंडळाने केले आहे. पंढरपूर येथून पांडुरंग पादुका सोहळा प्रस्थान होताना विठ्ठल रुख्मिणी समितीचे विभाग प्रमुख संभाजी देवकर, व्यवस्थापक बालाजी पुंडलवाड, शकुंतला नडघीरे, श्री संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील व मुक्ताई संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, पालखी सोहळा पत्रकार संघ अध्यक्ष सूर्यकांत भिसे, जयवंतराव महल्ले, सम्राट पाटील आदी उपस्थित होते.