शहादा, दि.०३
येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी संस्था स्तरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत पुणे व व्यक्ती स्तरावर आदर्शगाव बारीपाडा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त मा. श्री. चैत्राम देवचंद पवार यांना दिला जाणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव प्रा. मकरंद पाटील यांनी दिली आहे.
शहादा येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप रु. १ लाख व मानचिन्ह या स्वरुपाचे असते.
आतापर्यंत हा पुरस्कार व्यक्ती स्तरावर मा. प्रा. डॉ. राम ताकवले (माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली, मा. डॉ. यु. म. पठाण (संत साहित्याचे गाढे अभ्यासक ), मा.डॉ. विजय भटकर (परम हा संगणकाचे प्रमुख वैज्ञानिक ), मा. डॉ. वसंत गोवारीकर (माजी संचालक, इस्रो, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ), मा. प्रा. सुखदेव थोरात (माजी चेअरमन, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली. मा. डॉ. नागनाथ कोतापल्ले (माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) मा. डॉ. जयंत नारळीकर (जेष्ठ गणितज्ज्ञ व भौतिक शाखज्ञ, पुणे ) डॉ. दिपक जयंतराव टिळक (कुलगुरु, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे) डॉ. बी. के. गोयल (बॉम्बे हॉस्पीटल, बॉम्बे), डॉ. नरेंद्र जाधव (सदस्य, नियोजन आयोग नवी दिल्ली), डॉ. सदानंद श्रीधर मोरे (प्राध्यापक तत्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे) मा. सौ. सिंधुताई सपकाळ (माई अध्यक्षा, सन्मती बाल निकेतन संस्था), डॉ. शरद पी. काळे (भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील न्युक्लीअर अॅग्रीकल्चर व बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख ), मा. श्री. पोपटराव पवार (सरपंच हिवरे बाजार अहमदनगर, माजी विधानपरिषद सदस्य) जेष्ट कवी पद्मश्री ना. धो. महानोर, श्री. ज्ञानदेव गंगाराम हापसे उर्फ डॉ. डी. जी. हापसे (उस तज्ज्ञ), मा. श्री. सतीश मराठे (संचालक रिझर्व बँक ऑफ इंडिया), मा. श्री. पानिपतकार विश्वास पाटील (जेष्ठ साहित्यीक मुंबई), श्रीमती राहीबाई सोमा पोपेरे (कोंभाळणे ता.अकोले जि. अहमदनगर ) जादुगार जितेंद्र रघुवीर भोपळे पुणे यांना देण्यात आला आहे. तर संस्था स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, महात्मा ज्योतिबा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, श्री क्षेत्र चैतन्य अध्यात्मिक केंद्र. (दुधिबरे), मराठी साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्था बहादरपुर जि. जळगाव, साधना ट्रस्ट पुणे, हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड कोल्हापूर, सेवाग्राम आश्रम वर्धा, डॉ. लाजपतराय मेहरा न्युरोथेरपी सूर्यमाळ जि. ठाणे, पालवी प्रतिष्ठान पंढरपूर, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ धुळे, मराठी विज्ञान परिषद मुंबई, श्रध्दा रिहॅबीलीटेशन फाउंडेशन वेणगाव कर्जत जि.रायगड नाम फाउंडेशन पुणे, टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव जि. बुलढाणा, केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव यांना दिलेला आहे..
यावर्षी ९ ऑक्टोबर २०२३ रोजी संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत पुणे या दुष्काळ निवारण क्षेत्रात कार्य करणान्या संस्थेस देण्यात येणार आहे. संस्थेमार्फत ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्प, विकलांग कल्याण, पढ़ो परदेश योजना, जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलस्रोत विकास आदि क्षेत्रात कार्य करण्यात येते. संस्थेने सन २०१५- २०१६ या वर्षी दुष्काळ निवारण कामासाठी भरीव कार्य केले असून दुष्काळग्रस्त गावांमध्ये आवश्यकेतनुसार जलसंधारणाची कामे, पशुधन वाचविण्यासाठी चारा वाटप, चारा डेपो, जनावरांच्या छावण्या, मागेल त्या गावाला पाण्याची टाकी, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी कामे केली होती. समितीने दुष्काळग्रस्त लातूर, बीड, धाराशिव (उस्मानाबाद), संभाजीनगर (औरंगाबाद), परभणी, जालना, सोलापूर, सातारा, नगर, नाशिक व पुणे या ११ जिल्ह्यातील ३२५ गावांमध्ये विविध स्वरुपाची कामे केली आहेत. दुष्काळ निवारणासाठी निधी संकलन, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातही समितीचे कार्य असून समितीच्या वतीने पुरस्काराचा स्विकार महाराष्ट्र प्रांत कार्यालय पुणे येथील पदाधिकारी करणार आहेत.
व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार आदर्शगाव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे येथील समाजिक कार्यकर्ते, राज्यशासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त मा. श्री. चैत्राम देवचंद पवार यांना दिला जाणार आहे. त्यांच्या सामाजिक जाणीवेतून ग्रामविकासाच्या कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सन १९९२ पुर्वी बारीपाड़ा उजाड ओसाड माळरान, पिण्यासाठी पाणी नाही, शेतात पीक नाही, निरक्षरता, व्यसनाधिनता यांनी ग्रासलेला पाडा होता. परंतु १९९२ नंतर श्री. चैत्राम पवार यांनी गावकऱ्यांच्या श्रमदानाने ग्रामविकासाची लोकचळवळ उभी केली. या अंतर्गत गावात चराईबंदी, कु-हाडबंदी व दारुबंदी याचे उल्लंघन केल्यास दंड वसूल करण्यात येतो. सद्यस्थितीत गावाच्या शेजारी ४४५ हेक्टर वन जमिनीवर लोकसहभागातून वनसंवर्धन केले जात आहे. श्रमदानातून ४७० पेक्षा जास्त दगडी बंधारे बांधण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. आता बारीपाड्यातून परिसरातील ८ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मुबलक पाण्यामुळे परिसरात बागायती पिकांचे प्रमाण वाढले आहे. भातशेती व नागली पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात असून सुवासिक बासमती व इंद्रायणी तांदूळ गावातच पॅक करून मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठविले जातात. महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, सकस आहार, स्वच्छता, जलसाक्षरता, शिक्षण, आरोग्य आदिबाबत जनजागृतीचे उपक्रम श्री. पवार लोकचळवळीतून बारीपाड्यात राबवत असल्याने गावाचे नाव जागतिक स्तरावर पोहचले आहे. देश विदेशातील विविध पुरस्कार प्राप्त बारीपाड्याच्या मा. श्री. चैत्राम पवार यांना श्रमदान व लोकचळवळीतून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव प्रा. मकरंद पाटील यांनी दिली आहे. दरम्यान,सदर पुरस्कार प्रदान समारंभ सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.