नवी दिल्ली । राष्ट्रीय हरीत लवादाने गुरुवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले की तुम्हाला जबाबदारीची जाणीव नाही, जबाबदारी काय असते याची तुम्हाला थोडीही समज नाही. तुम्हाला जे वाटते ते बोलण्याची आणि जे मन करेल तर करण्याचे स्वातंत्र्य नाही.
गेल्या सात वर्षांपासून दिल्लीतील यमुनेच्या घाटावर आर्ट ऑफ लिविंगतर्फे कार्यक्रम आयोजित केला जातो. बुधवारी श्री श्री रविशंकर यांनी वक्तव्य केले होते की या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे जर पर्यावरणाला कोणती हानी होत असेल तर त्याला सरकार आणि कोर्ट जबाबदार आहे. कारण या कार्यक्रमाला त्यांनीच परवानगी दिली आहे. एका फेसबुक पोस्टमधून त्यांनी हे वक्तव्य केले होते. यात त्यांनी म्हटले की पर्यावरणाची हानी झाल्याने जर कोणता दंड आकारला जात असेल, तर तो राज्य सरकारला आणि राष्ट्रीय हरीत लवादाला लावला पाहिजे.
कारण त्यांनीच या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. जर यमुना नदी इतकीच शुद्ध आणि पवित्र असेल तर इथं होणारं वर्ल्ड कल्चर फेस्टिवल थांबवायला पाहिजे. गेल्या वर्षी वर्ल्ड कल्चर फेस्टिवल घेण्यास जी परवानगी मिळाली होती ती हरीत लवादाने रद्द करण्याची सूचना केली होती. मात्र त्यानंतरही आर्ट ऑफ लिविंगने हा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे हरीत लवादानं आयोजकांवर 5 कोटींचा दंड आकारला होता. आर्ट ऑफ लिविंगच्या या कार्यक्रमामुळे नदीचा घाट पूर्णपणे नष्ट झाला आहे. या कार्यक्रम 1 हजार एकरावर घेण्यात आला होता. तसंच 7 एकराच्या जागेवर स्टेज लावण्यात आला होता. त्यामुळे यमुनेच्या घाटाचे आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, हे नुकसान भरून निघायला आणखी 10 वर्ष लागेल तसंच त्यासाठी 42 कोटी रुपयांचा खर्च येईल, असे तज्ज्ञ लोक मानतात.