आर्थिक गुन्हे शाखेची भुसावळात कारवाई ; सहाय्यक निबंधकांच्या बनावट स्वाक्षरीने 101 चा दाखवला बनवत मालमत्तेची जप्ती अंगलट
भुसावळ- शहरातील श्री संतोषी माता मर्चंण्टस को ऑप.क्रेडीट सोसायटी लि.चे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे यांच्यासह पतसंस्थेचे वसुली अधिकारी प्रशांत लक्ष्मण भारंबे (निवृत्ती नगर, वृंदावन पार्क, भुसावळ) यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केल्याने शहरातील सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक निबंधकांसह तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात सहाय्यक निबंधकांची बनावट स्वाक्षरी करून 101 चा दाखला बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील तक्रारदार रवींद्र नारायण भोळे यांनी पुराव्यांसह स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेसह दिल्ली ईडीकडे तक्रार केली होती.
चेअरमन वासुदेव इंगळेंसह तिघांविरुद्ध गुन्हा
तक्रारदार रवींद्र नारायण भोळे (शांती नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नी संगीता भोळे यांनी संबंधित पतसंस्थेतून कर्ज घेतले होते मात्र कर्ज वसुलीसाठी कुठलीही नोटीस न देता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे, त्यांचे संचालक मंडळ, वसुली अधिकारी प्रशांत भारंबे व तत्कालीन सहाय्यक निबंधक गिरीधर फुलाजी अहिरे आदींनी सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातून संगनमत करून गुन्हेगारी कट रचत स्वःहस्ताक्षरात 101 चा खोटा दाखला बनवला तसेच त्यावर गोल व आडवा शिक्का मारत तक्रारदाराचा शांती नगरातील बंगला जप्त केला. तक्रारदाराने या कारवाईबाबत सखोल चौकशी केल्यानंतर 101 चा दाखला बनावट बनवला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी तक्रार दिल्यानंतर सोमवार, 5 नोव्हेंबर रोजी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर वासुदेव इंगळे यांच्यासह प्रशांत भारंबे यांना अटक करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मणजीतसिंग चवहाण, हवालदार मसूद शेख, शफी पठाण, सुनील सोनार, श्रीकृष्ण सपकाळे, सुभाष शिंदे, वसीम शेख आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याकामी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांचे सहकार्य लाभले.