श्री संत मुक्ताई पादुका पालखीत स्थानापन्न

0

मुक्ताईनगर : तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील जुनी कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिरात श्री संत मुक्ताई पादुका पालखी सोहळा संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते पूजन व पंचामृताचा अभिषेक करून पादुका पालखीत स्थानापन्न करण्यात आल्या. दहि-भात-पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करीत महाआरती करण्यात आली.
नाम विठोबाचे घ्यावे । पुढे पाऊल टाकावे ॥
हाची मुहूर्त शकुन । हृदयी विठोबाचे ध्यान ॥
या अभंगाच्या चालीवर व टाळ मृदुंगाच्या गजरात मुक्ताई पालखीचे गाभार्‍यातून मुहूर्त टळू नये म्हणून पालखीचे 27 मे 2020 रोजी प्रस्थान ठेवण्यात येवून पालखी श्री क्षेत्र कोथळी येथील जुने मंदिरातील कीर्तन मंडपात विसावली आहे. आता शासनाच्या पुढील सूचना येईपर्यंत कीर्तन मंडपात राहणार शासनाच्या सूचना प्राप्त होताच दिलेल्या नियम व अटीसह पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. तो पर्यंत कीर्तन मंडपात विसावलेल्या पालखी पादुकांना केवळ वारकर्‍यांद्वारे काकडा, अभिषेक, नैवेद्य नामगजर आदी सेवाद्वारे नित्योपचार केले जातील. परंपरेने पालखी प्रस्थान जेष्ठ शु.5 रोजी असते तेव्हा तिथीपरंपरा टळू नये म्हणून संस्थानने भाविक व शासन यांच्यात समन्वय साधत मोजक्याच आठ ते दहा भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान करवून वारकरी परंपरा जोपासली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील, पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज, मंदिराचे व्यवस्थापक हभप उद्धव महाराज जुनारे, हभप विशाल खोले महाराज, हभप चेतन महाराज मराठे, हभप पंकज महाराज, हभप रतीराम महाराज, हभप दुर्गाताई संतोष मराठे महाराज, हभप लखन महाराज, मंदिराचे पुजारी विनायक व्यवहारे, ज्ञानेश्वर हरणे, पत्रकार संदीप जोगी, संतोष मराठे, विनायक वाडेकर आदींची उपस्थिती होती.