श्री संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

0

मुक्ताईनगर : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनाची परंपरा असलेल्या मानाच्या सात पालख्यातील व संत परंपरेत लडिवाळ असलेल्या आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन व मंगलअभिषेक, महाआरती करण्यात आली. या पालखी सोहळ्याचे 20 वारकर्‍यांच्या सहभागाने सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास तीर्थक्षेत्र जुनी कोथळी मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे लक्झरी बसने मार्गक्रमण झाले.

टाळ, मृदुंगाच्या गजरात आमदारही रंगले 
आदिशक्ती मुक्ताई पादुका पालखी वारकर्‍यांच्या आनंदमयी वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात व मुक्ताईच्या नामघोषात मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराबाहेर निघत असतांना वारकर्‍यांच्या उत्साह व आनंदाला पाहून आमदार चंद्रकांत पाटील यांनादेखील पावली खेळण्याचा मोह आवरता आला नाही व चक्क त्यांनी टाळ , मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात अगदी जल्लोषात पावली करीत वारकरी भक्ती मेळ्याचा आनंद घेतला .

वाट पाहे निढळी ठेवुनिया हात ।
पंढरीच्या वाटे माझे लागले चित्त ॥
कई देखेन आता माझा माय-बाप ।
आषाढी आली सवे घेऊनी भक्त मेळा ।
मुक्ताई निघाली पंढरीला ॥

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, तहसीलदार शाम वाडकर, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे , पंजाबराव पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, उपसरपंच उमेश राणे, उद्धव महाराज जुनारे, विनायकराव हरणे, विशाल महाराज खोले, नितीन महाराज महाराज , ज्ञानेश्वर हरणे, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, पंकज महाराज, पुरुषोत्तम वंजारी, सुधाकर सापधरे, निवृत्ती पाटील, यु.डी.पाटील, नरेंद्र नारखेडे आदींसह वारकरी व भाविकांची उपस्थिती होती.

असा आहे पालखीचा प्रवास
हा पालखी सोहळा लक्झरीने प्रवास करीत असताना मंगळवारी पंढरपूर कडे मार्गस्थ असतांना बुलढाणा येथे राजेंद्र शिंगणे यांच्याकडे नाश्ता, दुपारी जालना येथे डॉ.राजेश टोपे यांच्याकडे फराळ व सायंकाळी वाशी (समरकुंडी फाटा) येथे चहापाणी घेऊन पुढे वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्या सोबत मुक्ताई पालखीची भेट होईल. लाखो भाविकांच्या उपस्थितीत मार्गस्थ होणारा मुक्ताई पालखी पादुका सोहळा यंदा कोरोना महामारीमुळे केवळ 20 वारकर्‍यांच्या उपस्थितीत पंढरीकडे जात आहे. 33 दिवसांचा 750 किलोमीटर चा पाई प्रवास व प्रवासामध्ये भाविक भक्तांची मिळणारी सेवा यावर्षी कोरोना मुळे खंडित झाल्याच्या खंत पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी व्यक्त केली

आमदारांनी दिले मास्क
आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालखी सोहळ्यात जाणार्‍या वारकर्‍यांना कोरोना महामारीबाबत काळजी घेण्याच्या सूचना करून वारकर्‍यांना पन्नास ब्रँडेड एन 95 मास्क देत पालखी सोहळा पंढरीत नेऊन सुखरूप माघारी आणण्यासाठी शुभेच्छा दिल्या.