श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त तळोद्यात भव्य रक्तदान शिबीर

0

तळोदा। येथील श्री. संत सावता माळी युवा मंच तर्फे आज रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्त दान श्रेष्ठ दान, रक्तदान कार्य महान, रक्त दान जिवनदान या उक्तीप्रमाणे तब्बल दोनशेच्यावर दात्यांनी रक्त दान करुन सदर शिबीर यशस्वी केले.श्री. संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथीचे औचित्य साधत तळोदयातील श्री. संत सावता माळी युवा मंचतर्फे आज मोठा माळी वाड्यातील श्री. संत सावता भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीरात माळी समाज बांधवांबरोबरच इतर समाज बांधवांनी पण मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

महिलावर्गाने मोठ्या संख्येने रक्तदान केले. सदर शिबिरात तब्बल दोनशेच्यावर दात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मोठ्ठी गल्ली, काका शेठ गल्ली व खान्देशी गल्लीतील माळी समाजाच्या नागरिकांनी विशेषतः युवकांनी तसेच माळी समाज पंच मंडळ, महिला मंडळ आणि सर्व समाजातील नागरिक तसेच नवजीवन ब्लड बँकेच्या कर्मचार्‍यांचे ही मोलाचे योगदान लाभले. यावेळी ब्लडबँकेकडून प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्तिपत्र देण्यात आले. यावेळी नवजीवन ब्लड बँकेचे डॉ. सुनिल चौधरी यांनी सांगितले की, श्री. संत सावता माळी युवा मंच मागच्या दोन वर्षांपासून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन रक्तदान शिबीराचे सुरेख आयोजन करीत आहे, त्यामुळे युवा मंचांचे सर्व कार्यकर्ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. तसेच भविष्यात कुठल्याही रक्त दात्यास रक्ताची गरज भासली, तर त्यास निशुल्क रक्ताची सोय करण्यात येईल असे आश्वासन सुध्दा यावेळी दिले.

जमा केलेली रक्कम सैनिक बँक खात्यात होणार जमा
तळोद्यात मागच्या दोन वर्षांपासून श्री. संत सावता माळी युवा मंचाकडून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी आयोजित केलेल्या शिबीरात 223 दात्यांनी रक्तदान केले होते तर मागच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात 294 दात्यांनी रक्तदान केले होते आणि यावर्षी तब्बल दोनशेच्यावर दात्यांनी रक्तदान करुन आपलाच विक्रम मागे टाकला. भारतीय सैनिकांसाठी मदतीचा एक प्रयत्न म्हणून भारतीय सैन्य निधीअंतर्गत एक दान पेटी ठेवण्यात आली आणि यावेळी जमा झालेली सर्व रक्कम केंद्र शासनाने सैनिकांसाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.