श्री सदस्यांतर्फे शहरात स्वच्छता अभियान

0

जळगाव । महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत शहरातील 247 टन कचरा स्वयंसेवकांनी गोळा केला. तसेच या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शहराबाहेर नेण्यात आला. यात ओला व सुका असा दोन्ही प्रकारचा वेगवेगळा संकलित करण्यात आला. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेचे उद्घाटन सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, शरद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्राम गृह, बसस्थानक, टेलीफोन व पोस्ट कार्यालय, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालय, सरकारी बँक, जिल्हान्यायालय, आरटीओ विभाग, एमएसईबी कार्यालय, वनविभाग, दूरदर्शन केंद्र, समाज कल्याण, पाटबंधारे, काव्यरत्नावली चौक, अजिठा फार्मा, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी, जि.एस.ग्राऊंड, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय व शहरातील मुख्य रस्ते आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात हजारोंच्या संख्येत स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

ठिकठिकाणी राबविली स्वच्छता मोहिम
स्वच्छता मोहिमेत 70 खासगी टॅक्टर व मनपाचे 9 असे एकूण 79 ट्रॅक्टर आणि मनपाच्या 30 घंटा गाड्या व 28 छोटा हत्ती असे एकूण 137 वाहने अभियानात दाखल झाले होते. या मोहिमेत संकलन झालेला कचरा डंपीग ग्राउंड- नेरीनाका, स्मशानभूमी, बहिनाबाई, डॉ. अग्रवारल कॉर्नर, विद्या फाउंडेशन, स्विमिंग टँक समोर सानेगुरुजी रुग्णालय येथे टाकण्यात आला. शहरातील संपूर्ण सरकारी कार्यालये व मुख्य रस्ते या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून यात एकूण 95 कि.मी.चा रस्त्यांचा परिसर चकाचक करण्यात आला.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य विश्‍वातील सर्व कार्यापेक्षा उत्तम असून या कार्यातून देवाची व समाजाची निस्वार्थ सेवा घडत आहे. यावेळी या स्वच्छता मोहिमेतून महात्मा गांधी यांनी सांगितलेले स्वच्छतेचे महत्त्व जपले जात आहे. स्वच्छतेमुळे मानवी जीवनाचे आरोग्य सुदृढ राहते. आपले घर, अंगण, परिसर स्वच्छ ठेवून संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य अनेक रोगांपासून दूर राहते. घराप्रमाणेच विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्वच्छतेकरीता शिपायाची वाट न पहाता स्वत: हे काम केल्यास तोही एक सेवेचा भाग आहे, असे मत महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, मनपाच्या आरोग्य विभागातील शरद पाटील यांनी व्यक्त केले.