जळगाव । स्वच्छतेचे महत्व सर्वाना माहित आहे. प्रत्येकाने व्यक्तिगत स्वच्छतेला अधिक प्राध्यान्य दिले पाहिजेच तद्वतच सार्वजनिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाहीे. स्वच्छतेबद्दल जनजागृती व्हावी यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानाची मोहिमच सुरु केली आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी 1 मार्च महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव या चार तालुक्यातून 379.85 टन कचरा जमा करण्यात आला. जिल्ह्यातील 7 हजार स्वयंसेवकांनी कचरा संकलन केले. जमा करण्यात आलेला कचरा शासकीय व खाजगी वाहनाने शहरांबाहेरील डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात आला. स्वच्छता अभियानात जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, धरणगावचे नगराध्यक्ष सलीम पटेल, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह शासकीय अधिकारी व राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता अभियानानिमित्त शहरातील नेहरु चौक ते टॉवर चौक , जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, पोलीस अधिक्षक कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छता करण्यात आली.
निस्वार्थ स्वयंसेवकांची फळी
विविध सामाजिक उपक्रमांना अध्यात्माची जोड देत लोकांची समुहशक्ति व मानसिकता एकसंघ बांधून ठेवण्याचे कौशल्य धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने श्रीसाधक परिवाराने समाजा पुढे ठेवलेले आहे. निस्वार्थ भावनेने काम करणार्या स्वयंसेवकांची मोठी फळी या परिवाराने तयार केलेली आहे. त्याचा प्रत्यय आजही राबविण्यात आलेल्या जिल्ह्यातील स्वच्छता अभियानात आला.