श्री सिध्दीविनायक व्यवस्थापन समितीवर पंकज गोरे

0

धुळे  । येथील युवासेनेचे प्रमुख पंकज गोरे यांची मुंबईतील श्री सिध्दीविनायक गणपती मंदीर व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून पंकज गोरेंच्या निवडीचे कौतूक होत आहे. या मंदीर व्यवस्थापन समितीवर शासनाच्या माध्यमातून 11 सदस्यांची निवड होते. त्यात अध्यक्ष म्हणून आदेश बांदेकर, सदस्या संजय सावंत, सुबोध आचार्य, विशाखा राऊत, वैभवी चव्हाण, पंकज गोरे या सेनेच्या सहा जणांसह भाजपाचे पाच सदस्य आहेत. पंकज गोरेंच्या निमित्ताने ही संधी धुळे जिल्ह्याला प्रथमच मिळाली आहे. पंकज गोरे यांनी निवडीनंतर शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सदस्यांना उध्दव ठाकरे यांनी मार्गदर्शनही केले.

सिध्दीविनायक व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती देवून त्याचा लाभ जनतेसाठी करून देण्याचे आवाहन करण्यात आले. सदस्यांच्या निवडीबद्दल उद्योगमंत्री सुभाष देसाई, धुळे जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी आदींनी अभिनंदन केले आहे.