ठाणे । मित्तल स्पोर्ट्स अकादमी आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी पुरुष, महिला प्रीमिअर लीग स्पर्धेत श्री स्वामी रायझिंग स्टार संघाने तुलसा वॉरिअर्स संघाला पराभूत करत पुरुष गटाचे विजेतेपद मिळवले. महिलांच्या लढतीत बी ग्रुप जम्पर्सने वर्चस्व राखत अजिंक्यपद मिळवले. अंतिम लढतीत निसटता विजय मिळवणार्या श्री स्वामी रायझिंग स्टार संघाला एक लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत पुरुष गटातील विजेत्या संघाचा अस्लम इनामदार सर्वोत्तम खेळाडु ठरला. महिलांमध्ये नवी मुंबई ग्रिफिनर संघाची मनीषा शिंदे (चिकणे) सर्वोत्तम खेळाडू ठरली. रोमहर्षक ठरलेल्या पुरुषांच्या अंतिम लढतीत प्रशांत जाधवने पहिल्याच चढाईत गुण मिळवत तुलसा वॉरिअर्सच्या गुणांचे खाते खोलले, तर विजेत्या संघाच्या अस्लम इनामदारने तसेच प्रत्युत्तर देत सामना रंगतदार ठरणार याची ग्वाही दिली. त्यानंतर कबड्डीप्रेमींना खेळाचा आनंद दोन्ही संघानी मिळवून दिला. कधी श्री स्वामी रायझिंग स्टारची बाजू वरचढ व्हायची तर कधी तुलसा वॉरिअर्सने मुसंडी मारलेली असायची.
सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघ 21-21 अशा बरोबरीत होते. सामना संपायला 5 मिनिटे शिल्लक असताना तुलसा वॉरिअर्स संघाने 30-28 अशी आघाडी घेतली होती. निर्णायक अवधीमध्ये मैदानात असलेल्या श्री स्वामी रायझिंग स्टार संघाच्य तिघा बचावपटूंनी प्रशांत जाधवची पकड करत सुपर टॅकलचे दोन मिळवून सामना 30-30 असा बरोबरीत आणला. सामना संपायला अवघे एक मिनिटे शिल्लक असताना सूरज बनसोडेने चढाईत एक गुण मिळवत तुलसा वॉरिअर्सच्या आघाडीत 31-30 अशी भर टाकली.
विजेत्यांच्या अस्लम इनामदारने शेवटच्या चढाईत दोन गुण मिळवत सामन्याचा निकाल बदलून टाकला. महिलांच्या अंतिम लढतीत बि ग्रुप जम्पर्सने नवी मुंबई ग्रिफिनर संघावर 17-15 असा विजय मिळवला. या सामन्यातही पराभूत झालेल्या नवी मुंबई ग्रिफिनर संघाने 8-7 अशी आघाडी मिळवली होती. उत्तरार्धात विजेत्यांच्या सायली परुळेकर, दर्शना सणस यांच्या चढाया आणि अर्चना करडेच्या पकडींमुळे संघाला सामन्यात 15-15 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर शेवटच्या सेकंदांमध्ये बी ग्रुप जंपर्स संघाने मनिषा शिंदेची सुपर टॅकल पकड करत दोन गुण मिळवत विजय नोंदवला.