श्री स्वामी समर्थ पालखीचे जल्लोषात स्वागत

0

जळगाव। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात श्री क्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समि पालखी -पादुकांचे आज जळगावनगरीत सायंकाळी 5.30 वाजता जल्लोषात स्वागत झाले. चिमुकले राम मंदिरापासून निघालेल्या स्वामींच्या पालखी शोभायात्रेत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्यावतीने आयोजित महाराजांच्या पालखी परीक्रमे अंतर्गत शहरात शिरसाळे परिवाराच्या वतीने सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाचे या सोहळ्याचे अकरावे वर्ष आहे. सायंकाळी 5 वाजता पालखीचे शहराच्या वेशीवर पूजन व स्वागत करण्यात आल्यानंतर चिमुकले राम मंदिराचे हभप दादा महाराज जोशी यांच्याहस्ते पुजन झाल्यानंतर चिमुकले राममंदिरापासून शोभायात्रेला सुरवात झाली.

रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी
शोभायात्रेत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शोभायात्रा कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक मार्ग गणेशवाडी येथील भिमराव शिरसाळे यांच्या निवासस्थानी आली. याठिकाणी राजेश शिरसाळे यांच्या हस्ते महाआरती होवून हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भोला महाराज यांच्यासह गणनाम् परिवाराच्या भजनाने स्वामीभक्त तल्लीन झाले होते. 8 रोजी सकाळी स्वामींच्या पादुकांचा महाभिषेक व दुपारी महाआरती झाल्यानंतर दुपारी 4.30 वाजता पालखी भुसावळडे मार्गस्थ होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.