पिंपरी-चिंचवड : सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणार्या निगडीतील श्रेया शंकर कंधारे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्रेयाच्या यशाचे कौतुक केले. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला महापौर नितीन काळजे, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, संजय भेगडे, गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे आणि श्रेयाचे कुटुंबीय उपस्थित होते.
दोन सुवर्णपदके पटकाविली
श्रेया कंधारे ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात इयत्ता बारावी (कला) शाखेत शिकत आहे. सातवीपासूनच तिला योगाची आवड होती. सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅपियनशिप क्रीडा स्पर्धेत श्रेया कंधारे हिने 16 वर्षे वयोगटात दोन सुवर्णपदके पटकाविली. आठ देशांतील दोनशेपेक्षा जास्त योगपटूंना नमवत तिने ही कामगिरी केली आहे.