मुक्ताईनगर। देशाप्रती आपले अधिकार, हक्क व कर्तव्य, कायदे जाणून घेण्यासाठी तसेच एक भारत श्रेेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी संविधान जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात संविधान विषयाचा समावेश करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय संविधान रथयात्रेचे प्रणेते तथा व्हिजन ऑफ बाबासाहेब वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडविन ओल्डन्स यांनी केले. ते मुक्ताईनगर येथे आयोेजित कार्यक्रमात बोलत होते.
मध्यप्रदेशातून मुक्ताईनगर येथे आगमन
देशातील प्रत्येक व्यक्तिपर्यंत भारतीय संविधान पोहचविण्याचे कार्य व व्रत हाती घेतलेल्या या सामाजिक संस्थेच्या संविधान संदेश यात्रेचे मध्यप्रदेशातून मुक्ताईनगर येथे आगमन झाले. संदेश यात्रेचे शहरात भव्य स्वागत करण्यात आले. यामध्ये 150 स्त्री, पुरुष प्रचारकांचा समावेश आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने पुर्णपणे सॅटेलाईटशी जोडण्यात आलेले हे वाहन आहे.
सर्व भारतीय आहोत याची भावना निर्माण करणे महत्वाचे
कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसलेल्या संदेश यात्रेचा उद्देश केवळ देशातील प्रत्येक व्यक्तिस संविधान, कायदा याविषयी साक्षर करणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेच्या माध्यमातून दिलेले अधिकार, हक्क व कर्तव्याची जाणीव करुन देणे. जातीपातींचे निर्मूलन करुन आपण सुरुवातीसही आणि शेवटीही भारतीयच आहोत, ही भावना निर्माण करणे, हाच मुख्य हेतू आहे, असे अॅडविन ओल्डन्स यांनी सांगितले.
महू येथून सुरुवात
सुरुवातीस प्रवर्तन चौकातील अर्धकृती फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यात्रेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती महोत्सवासून महू येथून झाली. या यात्रेत सहभागी झालेले प्रचारक हे स्वतःची नोकरी व संसार सोडून यात्रेत स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले आहे. देशातील जातीपाती नष्ट झाल्यास एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल. म्हणूनच चळवळीतील 150 व्यक्तिंनी त्यांची आडनावे गॅझेटमध्ये भारतीय अशी केली आहे. देशातील 552 जिल्ह्यांमध्ये संदेश यात्रा पोहचविण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे अॅडविन यांनी सांगितले. या स्वागत कार्यक्रमात भिमराव चिळगावकर, ओमप्रकाश पांडे, भिमराव वाघ यांनी स्वागत केले.