मुंबई: संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचे आरोप करत दोन दिवसांपूर्वी भाजपने आंदोलन केले होते. दरम्यान यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संकटकाळात राजकारण करणे ही आमची संस्कृती नाही. कोरोनाच्या संकटाशी सरकार आणि मंत्रिमंडळ समर्थपणे लढा देत असून संपूर्ण महाराष्ट्राचा आमच्यावर विश्वास आहे. राजकारण आम्हालाही करता येते, मात्र संकटकाळात आम्ही राजकारण करणार नाही. तुम्ही राजकारण करत रहा, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला हाणला. आज त्यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. राज्य सरकार पॅकेज जाहीर करत नसल्याचे सातत्याने आमच्यावर आरोप होत आहे, मात्र राज्यातील जनतेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही केल्या आहेत. रेशनकार्ड नसलेल्या लोकांना अन्न धान्य उपलब्ध करून देणे, अडकलेल्या लोकांना घरी मोफत पोहीचविणे, मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे पॅकेज नाही तर काय आहे? असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
50 हजार उद्योग सुरु
राज्यातील आर्थिक परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून राज्यातील 50 हजार उद्योग सुरु करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून जवळपास 6 लाख लोकांना कामावर हजर करण्यात आलेले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.