संकल्प करू या अवयवदानाचा!

0

पुणे येथील निविता पाटील या तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू व त्यानंतर तिच्या आईवडिलांचा तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय म्हणजे असंख्य मानवजातीला करून दिलेली मानवतेची शिकवणच होय. लहानग्या सुंदर, निरागस आणि आपल्या लोभस बोलण्यातून सर्वांना आपलं करणारी निविताचा मृत्यू बाल्कनीतून डोकावून पाहताना तोल जाऊन झाला. या सहन न होणार्‍या दुःखातून स्वत:ला सावरत तिचे नेत्रदान करण्याचा आईवडिलांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ती नव्याने हे जग अनुभवणार आहे हे नक्की!सर्वात श्रेष्ठदान म्हणजे अवयवदान. हे माहीत असतानाही आपण आजही देहाची माती करून घेण्यातच धन्यता मानतो. त्याच खुळ्या चालीरीती, स्वर्ग-नरकाची संकल्पना, मरणोत्तर मोक्ष न मिळण्याची भीती, समाजातील जुन्या चालीरीतीला न सोडण्याचा मोह ह्या सर्व गोष्टी अवयवदान न करण्यासाठी कारक ठरलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टीला न जुमानता आपण जोपर्यंत अवयवदानाचा संकल्प करणार नाही तोपर्यंत खर्‍या माणुसकीची ओळख होणार नाही, असे मला वाटते! स्वर्ग-नरक, मोक्ष, जन्म-मृत्यू पुनर्जन्म,आत्मा-परमात्माच्या वादात न पडता, आपण मृत्यूशी झुंज देणार्‍या रुग्णाला अवयवदान करून अवयवाच्या रूपाने पुन्हा दुसर्‍याच्या शरीरात वास करणे चांगले नाही का? मग आपण अवयवदान करण्यात मागे का? याचा विचार आपण करायला पाहिजे.

यासाठी एक उत्तम उदाहरण मला द्याव वाटतं! ब्राझिल देशातील थेन चिकीनो स्कार्पा या माणसाने एकदा घोषित केले की आपली करोडो डॉलर किमतीची बेंटली कार तो दफन करणार का ? तर त्याच्या मृत्यूनंतर त्याचं जीवन ऐषोरामात जावं म्हणून, त्याच्या या घोषणेमुळे त्याला मूर्खात काढण्यात आले. त्याच्यावर प्रचंड प्रमाणात चर्चा व टीका करण्यात आली. कोणी त्याला ती कार दान करण्याचा सल्ला दिला तर कुणीहा राष्ट्रीय संपत्तीचा नाश करणारा देशद्रोही म्हणून त्याला अपमानित केले. या सर्व टीकेला समोर जात त्याने कारच्या दफन विधीची तारीख जाहीर केली. अखेर तो दिवस उजाडला, लाखोंच्या संख्येने तिथे लोकांनी गर्दी केली. विविध प्रसार माध्यमे तिथे लाइव्ह प्रदर्शनासाठी तिथे सज्ज झाली. चीकानो स्कार्फाच्या अंगणातच कार पुरता येईल एवढा मोठा खड्डा करण्यात आला. पण थोड्याच वेळात त्यांनी ही कार न पुरण्याची घोषणा केली. हा दफनविधी कार्यक्रमाचा ड्रामा मी राष्ट्रीय कार्यासाठी केल्याचे गुपित सांगून, तिथे असणार्‍या असंख्य लोकांच्या टाळ्या व जयजयकाराच्या घोषणेस तो पात्र झाला. अवयवदानाचे महत्त्व आपल्या देशबांधवांना कळावे, हाच पवित्र उद्देश या दफन नाट्यामागे होता.चीकानो म्हणाला, लोकांनी ही महागडी कार मी दफन करणार म्हणून मला मूर्ख म्हटले, खरं तर हे आहे की या कारपेक्षा किमती अवयव हृदय, यकृत, फुप्फुसे, डोळे,मूत्रपिंड असे कित्येक महत्त्वपूर्ण, दुसर्‍यांना दान देणारे अवयव आपण मातीत पुरून टाकतो, तो मूर्खपणा नव्हे का? हाच मूर्खपणा आपण पिढ्यान्पिढ्या आपण करत आहोत!

अवयवदानाच्या संकल्पपूर्तीतून फक्त आपण जीवनदान देऊच शकत नाही, तर त्याही पलीकडे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बंधुभाव निर्माण करू शकतो. आपले अवयव हे कुणाच्या जीवनाला अभय देऊ शकते आणि आपल्याला गरज पडली, तर दुसर्‍याचे अवयव आपल्याला जीवनदान ठरू शकते, ही सत्यता असून ती आपण प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्याला रक्ताची गरज असली, की आपण ते कोणत्या धर्माच्या, जातीच्या माणसाचे आहे हे बघत नाही तसेच अवयवदान करताना व घेताना हे पाहिले जात नाही. त्यामुळे बंधुभावाची भावना प्रत्यक्ष कृतीत आणू शकतो. विज्ञानाने अनेक चमत्कार केले असले, तरी माणसाला लागणारे अत्यंत महत्त्वाचे रक्त, अवयव तो तयार करू शकला नाही. चला तर अवयवदानाचे संकल्प आपण आजच करू या!

– प्रा. वैशाली देशमुख
7420850376