ठाणे । मावळी मंडळातर्फे 93 व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित 67 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसर्या दिवशी पुरुष गटात बंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर, केदारनाथ क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघानी पढच्या फेरीत स्थान मिळवले. तर महिला गटात संकल्प ठाणे, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर व नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघानी आपली आगेकूच कायम राखली. स्पर्धेतील दुसर्या दिवसातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरुष गटात विजय नवनाथ मंडळाचा मयूरेश पांचाळ व महिला गटात टागोर नगर मित्र मंडळाची सायली पाठक यांची निवड करण्यात आली. महिला गटातील पहिल्या सामन्यात ठाण्याच्या संकल्प संघाने बदलापूरच्या श्री गणेश क्रीडा मंडळाचा 36-28 असा 8 गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात मध्यंतराला 19-12 अशी 7 गुणांची आघाडी घेतली ती मेघना खेडेकर, प्रियांका पॉल यांच्या उत्कृष्ट चढाई च्या जोरावर. मध्यंतरानंतर श्री गणेश क्रीडा मंडळाच्या प्रणिता सावंत हिने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु ती आपल्या संघाचा पराभव टाळू शकली नाही.
महिला गटातील दुसरा सामना अतिशय अटीतटीचा झाला. मुंबई उपनगरच्या टागोर नगर क्रीडा मंडळाने ठाण्याच्या होतकरू क्रीडा मंडळाचा शेवटच्या चढाईत 2 गुणांनी पराभव करून उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यानंतराला होतकरू क्रीडा मंडळाने 15-11 अशी 4 गुणांची आघाडी घेतली ती अद्वैता मांगलेच्या उत्कृष्ट चढाई व तिला मेधा भोईर हिने पकडीत दिलेल्या सुंदर साथी मुळे. मध्यंतरानंतर मात्र टागोर नगर क्रीडा मंडळाच्या सायली फाटक व नेहा फाटक यांनी आक्रमक चढाया करित आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली.
सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला टागोरनगरच्या अंकिता पन्हाळे हिने होतकरूच्या अद्वैता मांगलेची रोमहर्षक पकड करीत सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवला. पुरुष गटातील पहिल्या सामन्यात मुंबई शहरच्या बंड्या मारुती सेवा मंडळाने मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा मंडळाचा 27-24 असा 3 गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात पहिल्या डावात चेंबूर क्रीडा केंद्रा मंडळाच्या मंगेश शेडगे व गणेश साप्ते यांनी उत्कृष्ट चढाया करीत आपल्या संघाला 15-10 अशी 5 गुणांची आघाडी मिळवून दिली. परंतु सामन्याच्या उत्तरार्धात बंड्या मारुती सेवा मंडळाच्या सागर नार्वेकर व सुरज कान्होजीया यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुण संख्या वाढवली. सामना संपायला दोन मिनिटे असताना 3 गुणांची विजय आघाडी घेतली आणि सामना जिंकला.